सोलापूर : देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्यांचे दायित्व मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवेत, हे पुजार्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. धर्माच्या रक्षणासाठीच आपला जन्म झाला आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्म यांचे रक्षण करण्याचा प्रण घ्या, असे आवाहन नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत केले.
श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद होत आहे. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ५५० हून अधिक मंदिर प्रतिनिधी उपस्थित होते.
ओझर येथील श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थानचे विद्यमान विश्वस्त बबनराव मांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर महाराष्ट्र मंदिर महासंघाचा कार्यात्मक आढावा महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी मांडला. दुपारच्या सत्रात मंदिर सुव्यवस्थापन, तसेच पुजार्यांच्या समस्या आणि उपाययोजना यांवर परिसंवाद झाला. यानंतरच्या सत्रात संपादक नीलेश खरे यांचे मंदिर आणि मिडिया मॅनेजमेंट, तर माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांचे धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि मंदिरे यांचा समन्वय या संदर्भात मार्गदर्शन झाले.
प्रारंभी ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थानचे विश्वस्त बबनराव मांडे, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे . शंकर ताम्हाणे, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानचे कार्यकारी अध्यक्ष . मधुकर गवांदे, तुळजापूर येथील सिद्धगरीबनाथ मठाचे योगी मावजीनाथ महाराज, नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, अमरावती येथील श्री महाकाली शक्तीपीठाचे पिठाधिश्वर शक्तीजी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते . रमेश शिंदे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच रत्नागिरी येथील जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
श्री विघ्नहर ओझर गणपति मंदिराचे अध्यक्ष गणेश कवडे, देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे आणि ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, भाजपचे मंचर (पुणे) येथील किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष थोरात, श्री लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष . जितेंद्र बिडवई, श्री भीमाशंकर मंदिराचे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे, श्री मंगळग्रह देवस्थानचे डिगंबर महाले यांसह राज्यभरातून आलेले विविध मंदिरांचे विश्वस्त, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि मनिषा पाठक यांची उपस्थिती होती.