पुणे : राज्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. भ्रष्टाचाराच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) गेल्यानंतर कारवाई केली जात आहे. यासंदर्भात नॅशनल क्राईम ब्युरो २०२२चा अहवाल आला आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक भ्रष्टाचार होणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र सलग तिस-या वर्षी अव्वल स्थानी आहे.
दरम्यान, नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील अभियंता अमित गायकवाड याला एक कोटीची लाच घेताना पकडण्यात आले. त्याचा सहकारी गणेश वाघ अजूनही फरार आहे. एसीबीकडून राज्यात कारवाई होत असते. परंतु त्यानंतर लोकप्रतिनिधीवर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे प्रकार अगदी नगण्य आहेत. यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात टॉपमध्ये आहे.
नाशिक शहर पहिल्या क्रमांकावर
राज्यात भ्रष्टाचाराचे ९४९ गुन्हे नोंदवले गेले आहेत. देशात हे सर्वाधिक गुन्हे आहेत. यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या यंदाच्या वर्षातील आकडेवारीनुसार भ्रष्टाचारात राज्यात नाशिक शहर पहिल्या क्रमांकावर आहे.
पुणे दुस-या क्रमांकावर
शिक्षणाचे माहेरघर आणि देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराने भ्रष्टाचारात आघाडी घेतली आहे. पुणे शहर भ्रष्टाचाराच्या यादीत दुस-या क्रमांकावर आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ या म्हणीप्रमाणे भ्रष्टाचारातही पुणे मागे नसल्याचे समोर आले आहे. भ्रष्टाचारामध्ये गेल्या वर्षी पुणे राज्यात पहिल्या क्रमांकावर होते. तर छत्रपती संभाजीनगर तिस-या क्रमांकावर आहे.
दंगलीमध्येही महाराष्ट्र अव्वल
देशात २०२२ मध्ये सर्वाधिक दंगलींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात दंगलीचे ८,२१८ गुन्हे नोंदवण्यात आले. नॅशनल क्राईम ब्युरो २०२२च्या अहवालात ही माहिती देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालय अंतर्गत नॅशनल क्राईम ब्युरोचे काम चालते. खून आणि हत्यांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारनंतर तिस-या क्रमांकावर आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रात २,२९५ खून झाले होते. महाराष्ट्रात बलात्काराची २,९०४ प्रकरणे घडली आहेत.