पुणे : प्रॉपर्टी एजंट होण्याचा विचार करत असाल किंवा सध्या प्रॉपर्टी एजंट असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. १ जानेवारीपासून महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय प्रॉपर्टी एजंटचा व्यवसाय करता येणार नाही. महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय नोंदणी नूतनीकरणही करता येणार नाही. पालन केले नाही तर कारवाई होणार आहे.
एजंट्सच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहित प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केले होते. या अटीची पूर्तता करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. आता १ जानेवारीपासून हे प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन एजंट म्हणून नोंदणी किंवा नूतनीकरणही न करण्याचा निर्णय महारेराने घेतला असून तसे आदेश नुकतेच जारी केले आहेत.
शिवाय सध्याच्या परवानाधारक एजंट्सना आणि विकासकांकडील या कामांशी संबंधित कर्मचा-यांनाही १ जानेवारी २४ पूर्वीच हे प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर त्यांनी नोंदवणे आवश्यक आहे. विकासकांनीही त्यांच्या व्यवहारांसाठी १ जानेवारीनंतर अशाच प्रशिक्षित एजंट्सचीच नावे संकेतस्थळावर ठेवावी आणि त्यांची मदत घ्यावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या या क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या तीन परीक्षांमधून सुमारे ८ हजार एजंट्स पात्र ठरलेले आहेत.
प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी
गेल्या वर्षी याबाबतचा निर्णय महारेराने जाहीर केल्यानंतर विकासकांच्या स्वयंविनियामक संस्थांसोबत इतर संस्थांनीही या अनुषंगाने अनेक प्रबोधनपर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले होते. मोठ्या प्रमाणात आयोजित या कार्यक्रमांना महारेरातील वरिष्ठांसोबतच या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही हजर राहून मार्गदर्शन केलेले आहे. एजंट्सना प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी महारेराने सुमारे वर्षाचा कालावधी दिलेला आहे.