28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीमहावितरणने आकडे काढण्याची मोहीम राबवावी

महावितरणने आकडे काढण्याची मोहीम राबवावी

परभणी/प्रतिनिधी
आकडे टाकून अवैध कनेक्शन घेतल्यामुळे ट्रान्सफॉर्मवर क्षमतेपेक्षा जास्त भार येऊन ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे महावितरणने आकडे काढण्याची मोहीम राबवावी, अशी सूचना एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी केली आहे.

महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते गुरूवार, दि.३० रोजी बोलत होते. यावेळी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, आ. मेघना बोर्डिकर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक राम कुलकर्णी, महापारेषणचे संचालक संदिप कलंत्री, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये, महापारेषणचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर उपस्थित होते.

पुढे विश्वास पाठक म्हणाले की, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर किंवा नादुरुस्त झाल्यानंतर तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी मोहीम राबविण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरणने व्यापक काम सुरू केले असून या मोहिमेला यश मिळत आहे. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याची खबर थेट देता यावी यासाठी महावितरणने टोल फ्री नंबरची सुविधा उपलब्ध केली आहे तसेच महावितरणच्या अ‍ॅपवरूनही खबर देता येते. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीवर मुख्यालयातून देखरेख ठेवण्यात येत आहे. वाढत्या वीज मागणीमुळे वीज वितरण जाळे मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने आरडीएसएस ही योजना देशभर राबविण्यात येत आहे. त्याच्या अंतर्गत जिल्ह्यात ११०८ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. नवीन वीज उपकेंद्रे उभारणे, वीज वितरण व्यवस्था बळकट करणे, स्मार्ट मीटर बसविणे अशी कामे या योजनेत करण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. त्यामध्ये सौर उर्जेचा वापर करून ७ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी साडेतीन हजार मेगावॅट वीज निर्मितीची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत. पंतप्रधानांची आरडीएसएस योजना आणि उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांमुळे राज्याचे ऊर्जा क्षेत्र आमूलाग्र बदलणार आहे, असे विश्वास पाठक म्हणाले.

आ. गुट्टे यांनी शेतीसाठी नियमित व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. आ. मेघना बोर्डिकर यांनी सेलूमधील उद्योगांसाठी महापारेषणचे नवे उपकेंद्र उभारण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार नवे उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू झाल्याची माहिती महापारेषणच्या अधिका-यांनी दिली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR