धाराशिव : सुभाष कदम
धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघाचे महाविकास (इंडिया) आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मंगळवारी (दि. १६ एप्रिल) धाराशिव शहरातून भव्य अशी रॅली काढून, शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यानंतर नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरील प्रांगणात मोठी सभा झाली. या सभेला मिळालेला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते चार्ज झाले आहेत.
शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी मंगळवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर धाराशिव शहरातील नगर परिषदेच्या प्रांगणात दुपारी मोठी सभा झाली.
यावेळी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख, युवा सेनेचे (ठाकरे) प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार, शिवसेना (ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, उमेदवार ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी आ. राहुल मोटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, डॉ. प्रतापसिंह पाटील, माजी आ. दयानंद गायकवाड आदी नेतेमंडळी उपस्थित होती. धाराशिव शहरातून काढलेल्या रॅलीमध्ये उमेदवार ओमराजे निंबाळकर, आदित्य ठाकरे, आ. कैलास पाटील सहभागी होते. त्यांनी रोड शो करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या सभेत प्रमुख नेत्यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर टीका केली. सभेला जमलेली मोठी गर्दी पाहून नेतेमंडळी व कार्यकर्तेही चार्ज झाल्याचे जाणवत आहे.
धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी उन्हाचा पारा ४२ अंशावर होता. रखरखत्या उन्हात कार्यकर्ते शहरातून काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी आ. कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील अण्णा भाऊ साठे चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. धारासूरमर्दिनी देवी मंदिर, हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी रहे दर्गा, नेहरू चौक, आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून सभा झाली.