परभणी : प्रवीण चौधरी
राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या ४८ जागांपैकी महायुतीला ४२ जागा तर महाविकास आघाडीला केवळ ६ जागा मिळतील असा दावा रासपाचे अध्यक्ष तथा महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी केला आहे.
परभणी लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. महाविकास आघाडी व महायुतीकडून या लोकसभेवर आपलाच झेंडा फडकणार असा दावा केला जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाती-पातीच्या आधारावर ही निवडणूक झाल्याने नेमका अंदाज येत नसून कोण बाजी मारणार हे ४ तारखेला समोर येणार आहे.
दरम्यान रासपाचे महादेव जानकर हे निवडणुकीनंतर परभणीत आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, परभणी लोकसभेच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर राज्यभरात महायुतीच्या उमेदवारांसाठी ५५ सभांबरोबरच पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी घेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. राज्यात सोमवार, दि. २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच आपण परभणीत दाखल होत शेतक-यांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा प्रशासनासोबत चर्चा केली. तसेच अवकाळी पावसाने शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. परभणीकरांनी मला विकासाच्या बळावर मोठी मदत केली असल्याने या मतदार संघातील गुलाल सर्वसामान्य जनतेचा व शेतक-यांचा असेल असे ते म्हणाले.
या निवडणुकीत जरांगे यांच्या आंदोलनाचा मला थोडा फटका बसला आहे. आपण विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढविली असून समोरच्या उमेदवारांनीच ही निवडणूक जाती-पातीवर नेण्याचे सांगत आपण प्रचारादरम्यान केवळ विकासावरच भर दिल्याचे ते म्हणाले. मी परभणीकर म्हणून यापुढे काम करणार असून नुकतेच आपण परभणीत घर देखील बघितले असून परभणीचा खासदार मीच होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात महायुती व महाविकास आघाडीकडून ४८ जागा लढविल्या आहेत. आपण राज्यात ५५ सभा घेतल्या असून या निवडणुकीत महायुतीला ४२ जागा मिळतील व महाविकास आघाडीला ६ जागा मिळतील असा दावा त्यांनी केला.