मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप होत असून, वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील महिला नेत्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत महिलांनी झेंडा रोवलाय. आताच्याच काळात महिला सर्व क्षेत्रांत पुढे येत आहेत असे आपल्याला वाटत असेल, पण १९६२ पासूनच राज्यातील राजकारणात महिला सक्रिय असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पण, त्याचे प्रमाण खूप कमी आहे.
१९६२ पासून ते २०१९ पर्यंत महिला उमेदवारांची संख्या व विजयी महिलांची संख्या पाहत असताना १९६२ मध्ये ३६ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील १३ महिला विजयी झाल्या. १९६७ मध्ये १९ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील ९ महिला विजयी झाल्या. १९७२ मध्ये ५६ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील २६ महिला विजयी झाल्या. १९७८ मध्ये ५१ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील ८ महिला विजयी झाल्या. १९८० मध्ये ४७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील १९ महिला विजयी झाल्या.
१९८५ मध्ये ८३ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील १६ महिला विजयी झाल्या. १९९० मध्ये १४७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील केवळ ७ महिला विजयी झाल्या. १९९५ मध्ये २४७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील केवळ ११ महिला विजयी झाल्या. १९९९ मध्ये ८६ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील १२ महिला विजयी झाल्या.
२००४ मध्ये १५७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील १२ महिला विजयी झाल्या.
२००९ मध्ये २११ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील ११ महिला विजयी झाल्या. २०१४ मध्ये २७७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील फक्त २० महिला विजयी झाल्या.
२०१९ मध्ये २३९ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील २४ महिला विजयी झाल्या.
महिलांचा राजकारणातील सहभाग
राजकारणातील महिलांचा सक्रिय भाग हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हा सहभाग दोन पातळ्यांवर बघितला जाऊ शकतो, एक म्हणजे प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडणूक लढवणे आणि दुसरं म्हणजे मतदान प्रक्रियेत सहभाग घेणं. कोणत्याही निवडणुकीतील मतदानातील टक्केवारीचे प्रमाण काढताना तरुणांप्रमाणे महिलादेखील महत्त्वाचा घटक समजल्या जातात.