वाराणसी : श्री काशी विश्वनाथ मंदिरातील मुख्य पुजा-यास मानधन म्हणून ९० हजार रुपये मिळणार आहेत. तर कनिष्ठ पुजा-याला ८० आणि सहाय्यक पुजा-याला ६५ हजारांचे मानधन देण्यात येणार आहे. काशी विश्वनाथ मंदिर न्यासच्या १०५व्या बैठकीत ४१ वर्षांनंतर पुजारी सेवा नियमावलीवर एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
मंदिरातील पुजा-यांची एकूण ५० पदे असतील आणि त्यांच्या भरतीसाठी जाहिरात देखील दिली जाईल. याशिवाय जिल्हयातील सर्व संस्कृतच्या विद्यार्थ्यांना श्री काशी विश्वनाथ मंदिरात फ्री ड्रेस आणि पुस्तके दिली जातील.
पहिल्यांदाच मंदिर संस्कृत ज्ञान स्पर्धा देखील भरवेल. सोबतच शहरातील अनेक ठिकाणी प्रसाद देखील वाटप केला जाईल. तसेच संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाला अनुदान देखील देण्यात येईल, हे निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आले.
१९८३ मध्ये मंदिर ताब्यात घेतल्यानंतर पुजारी सेवा नियमावली मागे पडली होती. मात्र आता नवीन बदल पुढील दोन महिन्यात लागू केले जाणार आहेत.