22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयलोकांच्या आस्थेचा सकारात्मक वापर करा

लोकांच्या आस्थेचा सकारात्मक वापर करा

सुप्रीम कोर्टाकडून बाबा रामदेवांची कानउघाडणी

नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणा-या जाहिरातीवरून सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. यापूर्वीच्या सुनावणीत योगगुरू बाबा रामदेव यांच्याबरोबरच पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने बाबा रामदेव यांचे कौतुक करतानाच कानउघाडणीही केली.

न्यायमूर्ती हीमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि इतरांविरोधातील अवमान याचिकेवरील खटला चालवायचा की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. आज, मंगळवारी बाबा रामदेव न्यायालयात दाखल झाल्यावर न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांना प्रणाम केला. त्यावर उत्तर देताना न्यायमूर्ती अमानुल्लाह म्हणाले, ‘आमचाही प्रणाम.’ या प्रकरणाच्या सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सूट दिल्याने योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना दिलासा मिळाला आहे.

ज्या औषधांचे परवाने सस्पेंड करण्यात आले आहेत, त्यांची दुकानातील विक्री थांबविण्यासाठी तसेच ती औषधे घेण्यासाठी त्यांनी कोणती पावले उचलली आहेत, याबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

लोकांनी सतर्क राहिले पाहिजे, एवढाच आमचा उद्देश आहे, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने, बाबा रामदेव यांनीही जगभरात योगाचा प्रसार करण्यात योगदान दिले आहे. बाबा रामदेव यांच्यावर लोकांची आस्था आहे. त्यांनी त्यांचा सकारात्मक वापर केला पाहिजे, अशी कानउघाडणीही केली.

इंडियन मेडिकल असोसिएशनने नोव्हेंबर २०२३ मध्ये पतंजली आयुर्वेदविरोधात केस दाखल केली होती. अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांविरोधात जाणूनबुजून चुकीचे दावे पतंजलीने आपल्या जाहिरातींमध्ये केले, असा आरोप आयएमएने केला आहे. याबाबत, पतंजलीने तात्काळ सर्व जाहिराती थांबवाव्यात, असे आदेश न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये दिले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR