जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभर सभा घेत आहेत. आज जरांगे यांनी जालन्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा देत २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या आणि सर्व गुन्हे मागे घ्या अन्यथा चर्चेला येऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले.
आम्ही ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार, तुम्हाला जे काय करायचे ते करा. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर तुम्हाला बाथरुमदेखील उघडता येणार नाही. लक्षात ठेवा. मराठा समाजासोबत दगा केल्यास तुम्हाला सुटी नाही. भुजबळांच्या दबावाखाली येवून मराठा समाजाचे वाटोळे करु नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तुम्हाला शेवटची विनंती आहे. छगन भुजबळ यांच्या दबावात येऊन तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिले नाही आणि मराठ्यांचा घात केला तर तुमची गाठ महाराष्ट्रातील मराठा समाजाशी आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
२ तारखेला एक महिना पूर्ण होत आहे. अंतरवालीतील गुन्हे दोन दिवसांत आणि महाराष्ट्रातील सर्व गुन्हे दोन महिन्यात मागे घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून एका महिन्यात ४ लोक आले. उदय सामंत, धनंजय मुंडे, संदिपान भुमरे, अतुल सावे आले. यांनी गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र अंतरवालीतील कार्यकर्त्यांना का अटक केली, खोटे बोलून गद्दारी करू नका, असे जरांगे पाटील म्हणाले. अंतरवालीत प्राणघातक हल्ला आम्ही विसरलो नाही. आम्हाला सर्वांना अटक करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा, असेही जरांगे म्हणाले.
लातुरात कार्यक्रम होणारच
लातूरला कलम १४४ लागू केले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत लातुरात कार्यक्रम होणारच, असा निर्धार जरांगे पाटील यांनी बोलून दाखविला. स्थानिक प्रशासन अटक करत आहे की गृहमंत्री सांगत आहेत, असा प्रश्नदेखील जरांगे यांनी उपस्थित केला.
भुजबळांसोबत मुंडे, कुचेंना इशारा
मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर पुन्हा टीका केली. मराठा-ओबीसी सुखात नांदत असताना दंगली भडकवणारा मंत्री म्हणजे भुजबळ, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनाही मराठ्यांचे मतदान आहे. त्यांनादेखील बघू, असा इशारा देत त्यांनी आमदार नारायण कुचे यांनाही लक्ष्य केले. कुचे इकडे मला लोक फिरू देत नाहीत म्हणतात आणि तिकडे ओबीसी नेत्यांसोबत काड्या लावतात. त्यांनी आमचा नाद करू नये, असे सांगतानाच मुंडेंही ऊस तोडायला जावे लागेल, असे म्हटले.