27.6 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीपुर्वी शेतक-यांना कर्जमुक्त करा

विधानसभा निवडणुकीपुर्वी शेतक-यांना कर्जमुक्त करा

उद्धव ठाकरेंची मागणी सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू

मुंबई (प्रतिनिधी) : डबल इंजिन सरकारच्या आजपर्यंत घोषणा आणि थापा खूप झाल्या. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे कायमचे झाले आहे. या सरकारला जराही संवेदना असतील तर ज्या घोषणा केल्या त्याची पूर्तता किती झाली ते सांगावे, असे थेट आव्हान देत अजूनही विधानसभा निवडणुकीला ३ महिने आहेत. या ३ महिन्यांच्या आत शेतक-यांना कर्जमुक्त जाहीर करा, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरूवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवालय येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातल्या महायुती सरकारवर तोफ डागली. या सरकारचे निरोप घेण्याचे अधिवेशन आजपासून सुरू झालेले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात शेतक-यांची २ लाखांपर्यंतची पीक कर्जाची रक्कम माफ करत शेतक-यांना कर्जमुक्त केले होते तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम जाहीर केली होती; पण, दुर्दैवाने त्या काळात कोरोनाचे संकट आले. त्यानंतर गद्दारी करून आमचे सरकार पाडण्यात आल्याने ती रक्कम देऊ शकलो नाही, अशी खंत व्यक्त करतानाच आता ती रक्कम महायुती सरकारने अडवून ठेवली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला त्यामुळे नुसत्या घोषणा करू नका. शेतक-यांना कर्जमुक्ती करण्यासाठी अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

शेतक-यांची हालत गंभीर आहे. पाऊस म्हणावा तसा सुरू झालेला नाही. महाराष्ट्रात अजूनही अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याबद्दल सरकारला कुठलीही संवेदना नाही. साधरणत: रोज ९ शेतकरी आपले आयुष्य संपवत आहेत. जानेवारीपासून २ हजार ४६ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतक-यांचा कोणी वाली नाही. १० हजार २२ कोटींची नुकसानभरपाई बाकी आहे. प्रत्यक्ष शेतक-यांच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नाहीत. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. १ रुपयात पीक विमा घेणा-या शेतक-यांच्या खात्यात ७० रुपये जमा झाले आहेत, अशी शेतक-यांची व्यथा उद्धव ठाकरे यांनी सांगितली. हे घटनाबा सरकार अस्तित्वात आले तेव्हा घटनाबा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की, या पुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही; पण त्यांची पंचतारांकीत शेती आहे. राज्यात नव्हे तर देशात असा दुसरा कोणी शेतकरी नसेल जो हेलिकॉप्टरने स्वत:च्या शेतात जातो आणि पंचतारांकीत शेती करतो. विशेषत: अमावस्या आणि पौर्णिमला वेगळे पीक काढतात, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अर्थसंकल्प हा ‘गाजर संकल्प’
संपूर्ण महाराष्ट्र या खोके सरकारला ‘बाय बाय’ म्हणतोय. निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्याच कदाचित काही घोषणा होतील, अशी शक्यता आहे. केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प सादर केला जातो आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्यात समाविष्ट असतात त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. उद्या, घटनाबा सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे; परंतु अर्थसंकल्पात जो काही घोषणांचा पाऊस पडेल ते पाहता घटनाबा सरकारचा उद्याचा अर्थसंकल्प हा ‘गाजर संकल्प’ असणार आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

महागळती सरकार
केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे महागळती सरकार आहे. हे लिकेज सरकार आहे. हे राज्य कारभार सांभाळू शकत नाहीत. कारण राम मंदिराच्या गाभा-यात गळती होत आहे. पेपरफुटी झाली आहे, अशी टीका करतानाच आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय मांडले की ते आमच्यावर आरोप करीत आहेत त्यामुळे या अधिवेशनात आम्ही महाराष्ट्राच्या जनेतेचे प्रश्न उपस्थित करू, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला घेरण्याचे संकेत दिले.

लाडका भाऊ योजनाही आणा
मध्य प्रदेशात लाडली बहना अशी योजना आहे. तशीच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना हे सरकार आणत आहेत. ही योजना आणा आम्ही त्याचे स्वागत करतो; पण मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका, असा इशारा देतानाच ‘लाडका भाऊ’ म्हणून योजना आणा, मुलींप्रमाणे मुलांनाही मदत करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली मात्र, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना आणल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देऊ नका. कारण चंद्रपूरमधील त्यांचे भयानक हिंसक भाषण ऐकले की, अंगावर शहारा येतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुलींच्या मोफत शिक्षणाचे चॉकलेट
मुलींच्या मोफत शिक्षणाचे आश्वासन देणारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. पाटील यांनी आज मला भेटून चॉकलेट देऊन गेले तसेच मुलींच्या मोफत शिक्षण योजनेचे चॉकलेट त्यांनी दिले होते, ते आश्वासन पोकळ ठरले आहे त्यामुळे आता योजनांची चॉकलेट देऊ नका. कारण लोकांची सहनशक्ती संपलेली आहे. लोकसभेच्या निकालातून हे स्पष्ट झालेले आहे. जनता भोळी नाही, कोणीही यावे आणि गाजर दाखवून आपले काम करून घ्यावे, असे राहिलेले नाही, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR