प्रयागराज : प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात वाद झाला आणि त्या वादातून तिने हे पद सोडले. मात्र आता पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे. ममताने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद स्वीकारलं आहे. ममताने एक व्हीडीओ जारी करून त्यात ही माहिती दिली आहे. ममताने १ मिनिट १४ सेकंदाचा व्हीडीओ जारी केला आहे. त्यात तिने ही माहिती दिली आहे. तसेच महामंडलेश्वर पद सोडण्याचे नेमके कारणही तिने पहिल्यांदाच उघड केले आहे.
माझ्या गुरू स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर काही लोकांनी चुकीचे आक्षेप घेतले होते. त्यामुळे मी दु:खी झाले होते. त्या भावनेतूनच मी महामंडलेश्वर पद सोडले. महामंडलेश्वर झाल्यावर मी माझ्या गुरूला भेट दिली होती. छत्र, छडी आणि चंवर भेट म्हणून माझ्या गुरूला दिले होते. त्यानंतर उरलेली रक्कम मी भंडा-यासाठी दिली होती. मला पुन्हा महामंडलेश्वर पदी बसवल्याबद्दल मी माझ्या गुरूची कृतज्ञ आहे. या पुढे मी माझे आयुष्य किन्नर आखाडा आणि सनातन धर्माला अर्पण करणार आहे, असे ममताने म्हटले आहे.
गुरू काय म्हणाल्या?
किन्नर आखाड्याच्या पाठीधीश आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यमाई ममता नंद गिरी ही किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनलीय आणि ती कायम महामंडलेश्वर राहील. तिने भावनेच्या भरात पदाचा राजीनामा दिला होता. पण आम्ही तो स्वीकारला नाही असे त्रिपाठी यांनी सांगितलं. त्यानंतर ममतानेही आपण महामंडलेश्वर पद पुन्हा स्वीकारल्याचा व्हीडीओ जारी करून आपल्या गुरुच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.