27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeमहाराष्ट्रमंडळ अधिकारी सुनील काकड यांच्यावर कोयत्याने हल्ला

मंडळ अधिकारी सुनील काकड यांच्यावर कोयत्याने हल्ला

नाशिक : प्रतिनिधी
गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिका-यावर कोयत्याने व दांडक्याने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील अधिका-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील मंडळ अधिकारी सुनील काकड यांच्यावर हा हल्ला झाला. चिंचोली फाटा परिसरात ६ मार्च रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संशयितांनी थेट मंडळ अधिकारी काकड यांच्या मानेजवळ कोयता भिरकावला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत दहशत माजवली. या घटनेत मंडळ अधिकारी अगदी थोडक्यात वाचले.

मंडळ अधिकारी सुनील काकड यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून संशयित अमोल भिसे, अतुल भिसे, अर्जुन भिसे व त्यांचे दोन अनोळखी साथीदार अशा पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचोली फाटा ते मोहगाव रस्त्यावर असलेल्या ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली. मंडळ अधिकारी सुनील काकड हे खासगी वाहनाने गस्त घालत असताना मोहदरी शिवारात पुणे-नाशिक मार्गावर मुरूम वाहतूक करणारे अवजड वाहन दिसले.

काकड यांनी चालकाला थांबवून रॉयल्टीबाबत विचारणा केली असता चालकाने रॉयल्टी नसल्याचे सांगून वाहन पळवले. काकड यांनी त्याचा पाठलाग करून चिंचोली फाटा ते मोहगावकडे जाणा-या रस्त्यावर ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयांजवळ वाहन अडवले.

चालक अमोल भिसे याने मंडळ अधिकारी काकड यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. अर्जुन आणि अतुल भिसे या दोघांनी काकड यांना पकडून ठेवले आणि लाकडी दांड्याने मारहाण केली. अमोल भिसेने लोखंडी कोयत्याने काकड यांच्या मानेवर वार केला. मात्र काकड यांनी हा वार चुकवून हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करून घेत घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यातून काकड सुदैवाने थोडक्यात वाचले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR