Homeसोलापूरमंगरुळ खूनप्रकरणाचा २४ तासांत उलगडा; पत्नी व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

मंगरुळ खूनप्रकरणाचा २४ तासांत उलगडा; पत्नी व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

तुळजापूर : तालुक्यातील मंगरुळ येथे घडलेल्या युवकाच्या खूनप्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले असून, घटनेमागील धक्कादायक सत्य समोर आले आहे.

कृष्णाथ आनंद साठे (वय ३६) यांचा मृतदेह तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नटकल पुलाजवळ आढळून आला होता. डोक्यात दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला.

तपासादरम्यान मयताची पत्नी प्रतिभा साठे (वय २८) आणि तिचा प्रियकर शुभम घाटूळे (वय २०) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुलाजवळ टाकल्याचे समोर आले आहे. मृतदेह काही अंतर फरपटत नेल्याचेही उघड झाले. पत्नीच या कटात सहभागी असल्याने प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू असून पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची साखळी मजबूत करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR