इंफाळ : बुधवारी रात्री उशिरा मणिपूरमधील इंफाळ येथील मणिपूर रायफल्सच्या कॅम्पवर जमावाने हल्ला केला. मणिपूर रायफल्सचा शस्त्रसाठा लुटणे हा जमावाचा उद्देश होता. मात्र, सुरक्षा जवानांनी हवेत अनेक राउंड गोळीबार करून जमावाला पांगवले.
यावेळी काही जण जखमी झाले. या घटनेनंतर इंफाळमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याच वेळी आदिवासी विद्यार्थी संघटनेने तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह शहरात अतिरिक्त पोलिस कमांडो तैनात केल्याच्या निषेधार्थ बुधवारी रात्री उशिरापासून ४८ तासांच्या बंदची घोषणा केली आहे. जमावाने इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाजवळ असलेल्या मणिपूर रायफल्स कॅम्पला लक्ष्य केले. मोरे येथे एका पोलिस अधिका-याच्या हत्येमुळे जमाव संतप्त झाला होता आणि त्याचा निषेध करण्यासाठी शस्त्रांची मागणी करत होता. वास्तविक, मंगळवारी मणिपूरमध्ये सुरक्षा दलांवर गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. पहिले प्रकरण तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह भागातील आहे, ज्यात चिंगथम आनंद कुमार या पोलिस अधिका-याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर पोलिस अधिका-याच्या मृत्यूनंतर परिसरात तैनात करण्यात आलेल्या पोलिस पथकावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात तीन पोलिस जखमी झाले.
४४ जणांना ताब्यात घेतले
मणिपूर पोलिसांनी बुधवारी दुपारी ४४ जणांना ताब्यात घेतले. रिपोर्ट्सनुसार, यापैकी ३२ लोक म्यानमारचे नागरिक आहेत. त्यांच्यावर एका दिवसापूर्वी तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह भागात एका पोलिस अधिका-याची हत्या आणि पोलिस कमांडो टीमवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
शोधमोहीम सुरू
या दोन घटनांनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवून संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मणिपूरमध्ये आरक्षणावरून ३ मे रोजी कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाला. हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत १८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ११०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.