मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमची विनंती मान्य करण्यात आल्याचे जाहीर केले.
दरम्यान यापूर्वी रात्री उशिरापर्यंत मनोज जरांगे आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात जवळपास तीन तास चर्चा झाली. यानंतर शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांना सगेसोयरे यांच्याबाबतचा अध्यादेश सुपुर्द करण्यात आला. तसेच यावेळी जरांगे यांच्या तीनही मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे आज (शनिवार) सकाळी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले.
शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आपला लढा होता तो मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र तातडीने द्यावेत तसेत नोंदी सापडल्या नाहीत त्या परिवारांना सुद्धा तातडीने प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावीत. ती प्रक्रिया सुरू झाली आहे.
५७ लाखांपैकी ३७ लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. याचा डाटा देखील देण्यात येणार आहे.
ज्यांची नोंद सापडली त्यांच्या सग्यासोय-यांसाठी अध्यादेश पारित करावा लागेल ही आपली सर्वांत मोठी मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या तिन्ही मोठ्या मागण्या मान्य झाल्याचे देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, अध्यादेशावर तीन तास मुंबई हायकोर्टाच्या २०-२२ ज्येष्ठ वकिलांनी मिळून प्रत्येक शब्दाची खात्री केली आणि त्यानंतरच आपण बाहेर पडलो. आपल्याला सग्यासोय-यांचे त्यामध्ये घ्यायचे होते ते घेतले आहे.
अंतरवाली येथे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील असेही जरांगे यावेळी म्हणाले. तसेच शिक्षणाबाबत ओबीसींच्या सवलती मराठा बांधवांना देखील देण्यात येतील, येत्या अधिवेशनात याचा कायदा करण्यात येईल.