17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम

मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम

आंदोलक आक्रमक, छ. संभाजीनगर जिल्ह्यात जमावबंदी

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. मराठवाड्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी गाड्यांची जाळपोळ, रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करण्यात येत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर वगळता जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नांदेड, धाराशिवमध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, अनेकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, बुधवारीही ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजाम करण्यात आला.

धाराशिवमध्ये रेल रोको करणा-या ९० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नांदेडमध्येही धरपकड सुरू आहे. बीड, छत्रपती संभाजीनगरमध्येही अनेकांवर गुन्हे दाखल केले असून, पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र, आंदोलक आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजाम सुरूच आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने शहर गंगापूर, वैजापूर, खुलदाबाद, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, पैठण, सोयगाव आदी तालुक्यातील इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद केली. फक्त संभाजीनगर शहरात इंटरनेट सेवा सुरू आहे. तसेच जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. या काळात सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पूर्णेत तहसील कार्यालय
जाळण्याचा प्रयत्न
परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीचा दरवाजा अज्ञात आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवार, दि. १ नोव्हेंबर रोजी घडली. मुख्य प्रवेशद्वारावर पेट्रोल टाकून आग लावली. यावेळी कर्मचारी व पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR