लातूर : प्रतिनिधी
मराठा अरक्षणाच्या प्रश्नाकडे सरकराचे लक्ष वेधण्यासाठी व हे आरक्षण तात्काळ मिळावे यासाठी लातूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा भगिणींनी रविवार दि. २९ ऑक्टोबर रोजी येथील महात्मा गांधी चौक परिसरात असलेल्या मनपाच्या ७० फुट उंचीच्या जलकुंभावर जावून आंदोलन केले. आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. अचानक झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली. दिवस मावळूनही महिला खाली उतरल्या नाहीत.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास मराठा समाजाच्या काही महिला येथील महात्मा गांधी चौकातील महापालिकेच्या जलकुंभावर चढल्या. याचा थांगपत्ताही कुणालाही लागला नाही. त्यानंतर त्यांनी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे अशी जोरदार घोषणाबाजी सुरु केली त्यामुळे तिथे मोठी गर्दी जमली. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधी चौक पोलिसांना हे कळताच फौजफाटा तिथे आला. महिला पोलिस आले. आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलही दाखल झाले. रुग्णवाहिका तयार ठेण्यात आली. जाळ्या घेवून अग्निशमन जवान हजर झाले. अधिकारी आंदोलनकर्त्या महिलांना खाली येण्याची विनंती करीत होते व परंतु महिला त्यास नकार देत होत्या.