नवी दिल्ली : आता दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी ‘हैदराबाद मुक्ती दिन’ देशभर साजरा केला जाणार आहे. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील शहीदांचे बलीदान लक्षात राहावे यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो दिवस १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आता दरवर्षी देशभरात ‘हैद्राबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा होणार आहे.
गृह मंत्रालयाने याबद्दल अधिसूचना जारी केली आहे. १५ ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील हैदराबाद संस्थानचा भाग १३ महिने निजामांच्या अधिपत्याखाली होता आणि त्याला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. ऑपरेशन पोलो नावाने पोलिस कारवाई नंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादच्या निजामाच्या राजवटीपासून मुक्तता मिळाली. गृह मंत्रालयाने म्हटले की, या परिसरातील लोकांची मागणी होती की १७ सप्टेंबर हैद्राबाद मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जावा.
तसेच अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, हैदराबादला स्वातंत्र्य मिळवून देणा-या शहीदांच्या आठवणी आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी मोदी सरकारने दरवर्षी १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ म्हणून साजरा केला जाईल.
भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीखाली होते. यावेळी रझाकारांनी येथील लोकांवर खूप अत्याचार केले. तेव्हा हैदराबादच्या तत्कालिन निजामाने भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध करत एकतर पाकिस्तानात सहभागी होण्याची किंवा मुस्लीम राष्ट्र निर्मितीची भूमिका घेतली होती. तेव्हा येथील नागरिकांनी हैदराबाद भारतात विलीन करण्यासाठी रझाकारांच्या अत्याचाराविरोधात लढा दिला.
१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामांच्या शासनाखाली होते. त्याला भारतात विलीन करण्याचे श्रेय तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जाते. सैनिकी कारवाईच्या मदतीने हैदराबाद भारतीय संघ राज्यात विलीन करण्यात आले. आता हा दिवस हैदराबाद मुक्ती दिवस म्हणून देशभर साजरा केला जाणार असल्याची घोषणा मोदी सरकारने केली.
मराठवाडा मुक्ती दिन देशभर साजरा होणार
केंद्र सरकारची मोठी घोषणा!