नांदेड : मराठवाड्यातील जिल्ह्यात दीर्घ अनुभव असलेले विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज नांदेड येथे बैठक आयोजित केली. या बैठकीच्या अनुषंगाने काही प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित करताना ते म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता आढावा बैठका घेणार आहे. सोबतच सर्व जिल्हाधिका-यांना पीपीटी करावेत, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. कोणकोणती विकासाची कामे प्रलंबित आहेत, याचा आढावा विभागीय आयुक्त म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा करणार. विकसित महाराष्ट्र, विकसित मराठवाडा आता थांबणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची विभागीय आयुक्त म्हणून नांदेड शहराला पहिलीच भेट आहे. आज त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील अधिका-यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. यामध्ये एसआयआर, कृषी विभाग, महापालिका, पोलीस विभाग आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागीय आयुक्तांशी संबंधित असलेल्या सर्वच अधिका-यांशी बातचित करून विकास आढावा घेणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की, येणा-या २०४५ मध्ये भारतामध्ये ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. यासाठी देशभरातील युवक-युवतींचा यात सहभाग मोठ्या प्रमाणात राहावा. जिल्ह्यातील क्रीडा संकुले ही केवळ पोलीस भरतीसाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी न वापरता आता त्या ठिकाणी सिंथेटिक टर्फ तयार करून त्यावर युवक-युवतींना प्रोत्साहन देण्यात सराव करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुले निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संभाजीनगर येथे जिल्हा क्रीडा संकुल निर्माण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुले तयार करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे मराठवाड्यातील औद्योगिक वसाहतींना चालना मिळावी यासाठी संभाजीनगरच्या धर्तीवर मराठवाड्यात उद्योग निर्मिती करण्यात येणार असून स्कोडा, टोयाटो यासारख्या कंपन्या इतर जिल्ह्यात कशा येतील व यासारख्या उद्योगांना कामगार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत. जिल्ह्यामधील शासकीय आयटीआय अपडेट करून तरूणांना विशेषत: महिलांना प्रशिक्षण देणार. संभाजीनगरमधील उद्योगामध्ये जवळपास एक लाख लोकांना रोजगार देऊ शकलो याचा मला आनंद आहे. महिलांसाठी संभाजीनगरला वर्किंग वूमन्स हॉस्टेल्स तयार करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्य महामार्गावरील अतिक्रमणे काढताना कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना तशा सूचना देण्यात येणार आहेत. सर्वांना नोटिस पाठवून नियमानुसार मोजणी करून घर, दुकान, कोणतेही अतिक्रमण असो ते हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणंद रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार आहे. आपसातील वाद मिटवून घ्या अन्यथा प्रशासन आपल्या पद्धतीने काम करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. विकासाच्या कामात कोणी आडवे आले तर गय करणार नाही. दहा लोकांमुळे हजार लोकांचे नुकसान होत असेल तर हजार लोकांचे हित लक्षात घेऊन कारवाई करणार.
शेवटी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील शेती उद्योजकाला चालना देण्यात येणार आहे. यासाठी जालना -नांदेड समृद्धी मार्ग वेगाने विकसित करण्यात येणार आहे. जालना येथे ड्रायपोर्ट निर्माण करण्यात येणार असून नांदेड, परभणी, हिंगोली येथील शेती उत्पादक या ठिकाणी पोहचून पुढे एक्सपोर्ट -इम्पोर्टसाठी लवकरात लवकर कसे पोहचतील यासाठी प्रयत्न करणार आहे. जालना -नांदेड समृद्धी महामार्गावर कोणी अडथळा आणत असेल तर त्यांच्याशी विचारविनिमय करून तात्काळ त्यांना मावेजा देण्यात येणार आहे. या विकास कामात कोणी नाहक त्रास देत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी माजी सभापती किशोर स्वामी, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, चारुदत्त चौधरी, विश्वनाथ देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
















