नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास, यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे दोन्ही देशातील हजारो निष्पाप नागरिकांना आपलाज जीव गमवावा लागला आहे. जगभरातील अनेक देशांनी युद्ध थांबवण्याचे आव्हान केले आहे, पण अद्याप युद्ध थांबलेले नाही. दरम्यान, या युद्धावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी गाझामध्ये सुरू असलेला नरसंहार थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सोशल मीडिया साइट (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली की, ५००० हून अधिक मुलांसह सुमारे १०,००० लोकांची हत्या करण्यात आली आहे. हे अत्यंत लज्जास्पद आणि भयानक आहे. रुग्णालये आणि रुग्णवाहिकांवर बॉम्ब फेकले, निर्वासितांच्या छावण्यांवर हल्ले करण्यात आले, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. हे सर्व होत असतान जगातील तथाकथित नेते नरसंहाराचे समर्थन करत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने ताबडतोब युद्धविराम आमलात आणावा असे आव्हान प्रियंका गांधी यांनी केले.
दरम्यान, यापूर्वी प्रियंकांनी संयुक्त राष्ट्र महासभेत गाझाच्या शांततेसाठी झालेल्या मतदानापासून भारताने स्वत:ला दूर ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या या वृत्तीचे आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, शांततेसाठी झालेल्या मतदानापासून दूर राहणे म्हणजे अंिहसा, न्याय आणि शांतता, या तत्त्वांना नाकरणे आहे, अशी टीका त्यांनी केली होती.