मुंबई : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. प्रचाराचा आता धुरळा उडणार आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते आता प्रचारासाठी संपुर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. त्यासाठी रस्ते मार्गाचा वापर होतो. प्रचारासाठी नेते मंडळींची पहिली पसंती असते ती हेलिकॉप्टरला. त्यामुळे वेगवान प्रवास तर होतो पण जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचताही येते. हे लक्षात घेता हेलिकॉप्टरची आगाऊ बुकींग केली जाते. त्यात महायुतीने बाजी मारली आहे. राज्यात उपलब्ध असलेली सर्व हेलिकॉप्टर महायुतीने बुक केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची हवाई कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभेचा निकाल लागताच भाजपने विधानसभेच्या प्रचारासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरकरिता राज्यात उपलब्ध सर्व २५ हेलिकॉप्टर बुक केल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी जे पैसे मोजले आहेत ते पाहून डोळे गरगरतील. हेलिकॉप्टरमध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे ट्विन इंजिन आणि दुसरा म्हणजे सिंगल इंजिन. या दोन्ही प्रकारच्या हेलिकॉप्टरचे भाडेही वेगवेगळे आहे. हे भाडे प्रतितास या प्रमाणे आकारले जाते.
ट्विन इंजिन या प्रकारच्या हेलिकॉप्टरला अधिक मागणी असते. या हेलिकॉप्टरमध्ये २ पायलट असतात. शिवाय इंजिनिअर ही त्यांच्या बरोबर असतात. या हेलिकॉप्टरची आसन क्षमता ही जास्त असते. यात जवळपास १० ते १२ जण बसू शकतात. या हेलिकॉप्टरमधून सुरक्षित आणि जलद प्रवास करता येतो. संकट प्रसंगी हे हेलिकॉप्टर एका इंजिनवरही काम करते. या हेलिकॉप्टरसाठी तासाला साडे चार ते पाच लाख रूपये मोजावे लागतात.
हेलिकॉप्टरमधला दुसरा प्रकार हा स्ािंगल इंजिन हेलिकॉप्टर हा आहे. यात २ पायलट असतात. त्यांच्या मदतीला इंजिनिअर ही असतो. यात एकूण ४ ते ५ जण बसू शकतात. तुलनेने हे लहान हेलिकॉप्टर असते. हे हेलिकॉप्टर थोड्या कमी वेगात जाते. या हेलिकॉप्टरसाठी तासाला तीन ते साडेतीन लाख रूपये मोजावे लागतात. राज्यात जी हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. ती सर्व आता महायुतीने बुक केल्याचे समोर येत आहे. त्यासाठी अॅडव्हान्स पेमेंटही देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या हवाई वाहतूकीत अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.