28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रदूधदरवाढ आंदोलन पेटले

दूधदरवाढ आंदोलन पेटले

निवेदन स्विकारण्यासाठी अधिकारी न आल्याने उबाठाचे रास्ता रोको आंदोलन

पुणे : दूधदरवाढी संदर्भात आंदोलन करत असताना महसूल प्रशासनाचा प्रतिनिधी निवेदन स्विकारण्यासाठी न आल्याने संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंचर येथे रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनाने प्रशासन गोंधळले होते. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

दूध उत्पादक शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मंचर येथे आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला शहरातून मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात दूध वाटप आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, राजाराम बाणखेले यांची भाषणे झाल्यानंतर महसूल प्रशासनाच्या प्रतिनिधीने निवेदन घेण्यासाठी पुढे यावे अशी सूचना करण्यात आली. मात्र बराच वेळ कोणताही प्रतिनिधी न आल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अचानक रास्ता रोको झाल्याने बंदोबस्तासाठी असलेले पोलिसही गोंधळले. सुमारे २५ मिनिट रस्ता रोको आंदोलन सुरू होते. यावेळी वाहतूक कोंडी झाली. प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलनकर्त्यांची समजूत घालताना प्रशासनाची दमछाक झाली. घोषणा देण्यामध्ये महिलाही आघाडीवर होत्या. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. नंतर आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यात यश आल्यानंतर नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी निवेदन स्विकारले.

अनुदान नको हमीभाव द्या
जिल्हाप्रमुख सुरेश भोर म्हणाले, दूध उत्पादक शेतक-यांना अनुदान नको तर हमीभाव हवा आहे. सरकारने नजीकच्या काळात लिटरला चाळीस रुपये हमीभाव दिला नाही तर गाई म्हशी घेऊन मंत्रालयावर आंदोलन करू, दुधावर बारा टक्के जीएसटी असताना केवळ पाच टक्के अनुदान देण्याचा फार्स सरकार करते आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकार करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR