24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार अपात्रता : आम्हाला पक्षाचा व्हीप मिळालाच नव्हता

आमदार अपात्रता : आम्हाला पक्षाचा व्हीप मिळालाच नव्हता

शिंदे गटाचा दावा २१ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज सुनावणी झाली. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीप आम्हाला मिळालाच नव्हता, असा दावा शिंदे गटाकडून आज करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना ई-मेलद्वारे पक्षादेश पाठवण्यात आला होता, असा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला तर तो ई-मेल आमच्या अशिलाचा नसल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे. ठाकरे गटाकडून या संदर्भात पुरावे सादर करण्यासाठी अर्ज करण्यात आला असून याला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला आहे. अध्यक्षांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला असून यावर २१ नोव्हेंबर रोजी होणा-या पुढील सुनावणीत निर्णय अपेक्षित आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २१ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी होणार असल्याचे सांगितले. ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रे, १६ नोव्हेंबरपर्यंत सर्व पुरावे सादर करावेत. ३१ डिसेंबरपर्यंत मला निर्णय द्यायचा आहे त्यासाठी दोन्ही गटांकडून मला सहकार्य लागेल. अधिवेशन काळातही सुनावणी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांसमोर गुरूवारी विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. व्हीपसंदर्भातील याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हीप मिळालाच नसल्याचा दावा करण्यात आला होत. शिंदे गटाच्या या याचिकेवर पुरावे सादर करण्यासाठी ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला. शिंदे गट जर व्हीप मिळाला नाही असे म्हणत असेल तर त्यांनी त्या विषयीचे पुरावे सादर करावेत अन्यथा व्हीप मिळाल्याचे पुरावे आम्ही सादर करतो, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. आमच्याकडे एकनाथ शिंदे यांना मेलवर व्हीप मिळाल्याचा पुरावा असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले.

संबंधित ई-मेल आयडी आपला नसल्याचे त्यांनी कधीही सांगितले नाही म्हणजे सर्वच आमदारांना व्हीप मिळाला. आयडी त्यांचाच असेल तर व्हीप मिळाला नाही हे सांगणे गंभीर आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. संबंधित सर्व आमदारांना ई-मेलद्वारे व्हीप दिला गेला आहे. ते नकार देत असतील तर मग त्यांनी आपले ई-मेल आयडी नसल्याचे सांगावे आणि कोणता आहे ते सांगावे. शिंदेंचा मेल आयडी त्यांच्या ताब्यात नसेल तर मेल फिशिंग झालेला असू शकतो. या शिवाय २१ जणांच्या ई-मेल आयडीवरही व्हीपचा मेल आला नाही, असे ते सांगतात. तसे असेल तर त्याची खातरजमा आयटी तज्ज्ञांकडून करता येईल.

मुळात विजय जोशी यांच्या ई-मेलवरून एकनाथ शिंदे यांना व्हीप मेलवरून पाठवला होता, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आला. विजय जोशी कोण आहेत? मला माहिती नाही, अशी भूमिका शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी मांडली. ठाकरे गटाला पुरावे सादर करण्यास विरोध करताना तुम्ही तुमच्या याचिकेत कागदपत्रे जोडली नाहीत ही तुमची चूक आहे. दरवेळेस तुम्ही नवीन कागदपत्रे सादर करू शकत नाहीत. दरवेळेस कागदपत्रे जोडली तर हे कधीच थांबणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR