मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा मंजूर करताना विधानपरिषद आमदार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली. मिळालेल्या संधीचे १०० टक्के सोने करण्याचा मी प्रयत्न करेन असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले तर एका माथाडी कामगाराचा मुलगा आपल्या पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचा विशेष आनंद असल्याची प्रतिक्रिया पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. हा शेवट नाही तर एका नव्या पर्वाची सुरुवात आहे, अशी भावना मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले होते. स्वत: जयंत पाटील यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण अजून प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याचे स्पष्ट करताना भाजप प्रवेशाच्या बातम्या निराधार असल्याचा दावा केला होता. मात्र राज्याच्या नेतृत्वात बदल होणार, शरद पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाकरी फिरवणार अशी कुजबूज सुरूच होती व ती कुजबूज अखेर खरी ठरली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची बैठक आज मुंबईतील स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. या बैठकीत अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपवल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. राज्यातील प्रत्येक प्रश्नांना आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करेन. तसेच पक्ष संघटना राज्यात सगळीकडे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली, या संधीचे १०० टक्के सोने करण्याचा मी प्रयत्न करण्याचे काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
ही नव्या पर्वाची सुरुवात : जयंत पाटील
मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात हा शेवट नाही, एका नव्या पर्वाची सुरुवात आहे..! ही कविता वाचून दाखवली. पूर्वी पक्षात नेत्यांच्या मुलांनाच पदे मिळाली पण ही प्रथा मोडून काढत सामान्य घरातील तरुणांना संधी दिली. मी गेल्या २५ वर्षांपासून या पक्षात काम करत आहे. शरद पवार यांचा निर्णय मी नेहमीच अंतिम मानला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता नेता होऊ शकतो हे आर. आर. पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहे. तशा प्रकारचे काम करून सर्वासामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात मी कायम आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहे, वेळ पडली तर रस्त्यावर देखील उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही. आगामी महापालिका निवडणुका पाहिल्या तर आमच्यासमोरील आव्हाने मोठी असणार आहे असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. पुढील महिनाभरात संपूर्ण राज्यात दौरा करून पक्ष संघटना आणखी मजबूत करण्याचा आपला प्रयत्न असेन. तरुणांना, नवीन लोकांना पक्षात काम करण्याची संधी देण्याचा आपला प्रयत्न असेल असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.
सामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष
पक्षाच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीची घोषणा करताना शरद पवार यांनी माथाडी कामगाराचा मुलगा, लिपिकाचे काम करणारा हा कार्यकर्ता राज्यात पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सांगितले. जयंत पाटील यांनी अडचणीच्या काळात साथ दिली. ७ वर्षे पक्षाचे नेतृत्व केले. अहोरात्र कष्ट केले, अशी प्रशंसा पवार यांनी केली. शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व माथाडी कामगारातून उभे राहिले आहे. मी पहिल्यांदा १९६५ साली मुंबईला आलो तेव्हा सांगोल्याच्या मित्रांसोबत राहत होतो. शशिकांत शिंदेंचे वडील गोदीत काम करत होते, त्यावेळी मी गोदी पहिली. प्रचंड कष्ट करणारा माथाडी कामगार जवळून बघितला. माथाडी बोर्डात काम करणा-यांमध्ये शशिकांत शिंदे होते. सामान्य माणसांच्या विचारांशी निष्ठा, यासोबत कधीही तडजोड केली नाही. लोकसभा निवडणुकीला सातारा कोण लढणार? असा प्रश्न आला. शशिकांत शिंदे म्हणाले मी लढतो. तुम्ही सांगितले तर लढतो, त्या निवडणुकीत यश आले नाही. मात्र, त्याने संघर्ष केला. सध्या संघर्षाचा काळ आहे. त्यामुळे, संघर्ष करणा-या व्यक्तीला आपण संधी दिली आहे. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा उभा राहील. कारण, विचाराने काम करणे ही त्यांची खासियत आहे असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
ज्यांना शक्ती दिली ते सत्तेकडे गेले : शरद पवार
शरद पवार यांनी आपल्या भाषणात पक्ष फोडून भाजपासोबत गेलेल्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. आपण ज्यांना शक्ती दिली ते सत्तेत सहभागी झाले. आज महाराष्ट्रात संकट आहे, आपण त्याला सामोरे जाऊयात. आज एक गृहस्थ मला भेटले, टीव्हीवर एक चित्र आले. लातूरमध्ये एक शेतकरी आणि त्याची बायको नांगरत होती. त्या शेतक-यावर ४० हजार रुपयांचे कर्ज आहे. त्या कार्यकर्त्याने मला सांगितले मी ते कर्ज भरून आलो. मी म्हणालो हे का केले? तर तो म्हणाला मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. यातून प्रेरणा घ्या. महाराष्ट्राचे दौरे करा, राज्यातील तालुका-तालुक्याची परिस्थिती समजून घ्या. लोकांमध्ये काम करा, मग कसा पक्ष उभा राहत नाही पाहूया, असा मात्र शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
हा शेवट नाही
हा शेवट नाही — एका नव्या पर्वाची सुरुवात आहे,
नवीन नेतृत्वातसुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे.
मी फक्त एक मुख्य सेनापती होतो, सेना अजूनही सज्ज आहे,
नव्या युगातही ‘शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार’ हाच आमचा ध्यास आहे.
मी जातो आहे, पण सोडत नाही, एक पाऊल मागे घेतलंय, पण उद्दिष्टं अजूनही ठाम आहे.
कालही महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे,
नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी ‘जयंत’ आहे.