मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेणे हे महायुतीचे आता कर्तव्य आहे. तथापि, मनसेकडून जवळपास ११० मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली जात आहे. तर दुसरीकडे पडद्यामागे मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांच्या शिवसेनेला १० जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व जागांवर शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे एकनाथ श्ािंदे या जागा मनसेसाठी सोडणार का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला १० जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये वरळी, शिवडी, माहिम, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी, भांडुप, विक्रोळी, कल्याण यांचा समावेश आहे. वरळीत सध्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे विद्यमान आहेत. शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाचे अजय चौधरी हे विद्यमान आमदार आहेत. इथे मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माहिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. या जागेवर मनसेचे अमित ठाकरे हे पहिल्यांचा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
माहिम विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून देखील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पण सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला तर माहिममध्ये ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी थेट लढत बघायला मिळेल.
आदित्य ठाकरे अडचणीत
दुसरीकडे मनसेकडून शिंदे गटाला देण्यात आलेल्या प्रस्तावात वरळी मतदारसंघाचा देखील समावेश आहे. या मतदारसंघात श्ािंदे गटाकडून राज्यसभेचे खासदार मिल्ािंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली, तर मनसेकडून संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली. तसेच ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिंदे गट आणि मनसेकडून दोन तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्यात आल्याने आदित्य ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.