गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी द्वारका येथील सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. २०१७ मध्ये त्यांनीच या पुलाची पायाभरणी केली होती. हा पूल ओखी ते बेट द्वारकाला जोडेल. विशेष म्हणजे, उद्घाटनानंतर पीएम मोदींनी समुद्रात स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला. यावेळी पंतप्रधान मोदींनी समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली.
पीएम मोदींनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले की, समुद्रात बुडालेल्या द्वारका शहरात प्रार्थना करणे, हा एक दिव्य अनुभव होता. यामुळे मी अध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडला गेलो. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे कल्याण करोत. विशेष म्हणजे, पाण्याखालील द्वारकेत गेल्यावर भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी त्यांनी मोराची पिसे सोबत नेली होती.
मोदींच्या हस्ते पुलाचे उद्घाटन
आज सकाळी पंतप्रधान मोदींनी बेट द्वारका येथील मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतल्यानंतर ओखा ते बेट द्वारका बेटाला जोडणा-या २.३२ किमी लांबीच्या सागरी सेतू सुदर्शन पुलाचे उद्घाटन केले. हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे ज्याची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी २०१७ मध्ये केली होती. ९०० कोटींहून अधिक खर्च करून हा पूल पूर्ण झाला आहे.
लक्षद्वीपनंतर द्वारकेचे पर्यटन वाढणार
पीएम मोदींनी यावर्षी जानेवारी महिन्यात लक्षद्वीपला भेट दिली होती. येथे त्यांनी स्रॉर्कंिलगचा आनंद लुटला आणि त्याचे फोटोही शेअर केले होते. तसेच, देशवासीयांना सुट्टी घालवण्यासाठी येथे येण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंत लक्षद्वीपच्या पर्यटनात वाढ झाली आहे. आता त्यांनी द्वारकेचे फोटो शेअर केल्यामुळे द्वारकेच्या पर्यटनात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.