छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला आहे. कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टीत शेतकरी नागवला जातो. त्यामुळे या भागातील शेतक-यांमागील संकटांची मालिका काही कमी होताना दिसत नाही. यंदाही मराठवाड्याला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत मराठवाड्यात सावकारी चांगलीच फोफावत चालली असून, मराठवाड्यात तब्बल ११५० नोंदणीकृत सावकार आहेत तर १९० सावकारांनी परवानगीसाठी अर्ज केला आहे. यावरून सावकारी पाश दिवसेंदिवस वाढत चालला असून, यात शेतकरी भरडला जात आहे. सरकार सावकारीच्या मनमानीला लगाम घालणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकरी दुष्काळी संकटात सापडणे काही लोकांसाठी संधी आहे. कारण संकटात सापडलेल्या लोकांची कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पिळवणूक करून त्यांच्याकडून अव्वाची सव्वा रक्कम वसूल करण्याचा फंडा सावकारीच्या माध्यमातून सुरू आहे. मराठवाड्यात सावकारीच्या पाशात अडकून शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. मराठवाड्यात नोंदणीकृत सावकारांची संख्या ११५० वर आहे. यापेक्षा अनधिकृत सावकारीतही मराठवाडा मागे नाही. गुपचूप आर्थिक देवाणघेवाण करून अव्वाच्या सव्वा व्याज वसुलीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. यात एखाद्याचा बळी गेला तर सरकार कारवाई करण्याचा इशारा देते, परंतु त्याच्या मुळावर कधीच घाव घातला जात नाही. त्यामुळे दुष्काळी संकटात सापडलेल्या शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे.
बँकांकडून वेळेत कर्ज मिळाले नाही तर काही शेतक-यांना खासगी सावकारांकडे धाव घ्यावी लागते.
दुष्काळी स्थितीत सावकारी व्यवसायासाठी संधी ठरतानाचे चित्र उभे राहिले आहे. त्यामुळे मराठवाड्यात खाजगी सावकारीसाठीच्या परवान्यांमध्ये वाढ झाली आहे. आधीच ११५० नोंदणीकृत सावकार असताना आणखी १९० जणांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. या आकडेवारीमुळे सावकारी व्यवसायाच्या अर्थकारणाची चर्चा सुरू झाली आहे. पण आता नव्याने सावकारी करण्यासाठी परवान्यांची संख्या वाढत असताना या सावकारीला परवाने द्यायचे की नाही, नूतनीकरण केलेल्या सावकारांवर कसा अंकुश ठेवायचा, याबाबत सरकारचे धोरण महत्त्वाचे ठरणार आहे.
परवान्यासाठी लातूर जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक सावकारी करण्यासाठीच्या परवान्याचे ६८ अर्ज दाखल झाले आहेत. नांदेडमध्ये ३६, धाराशिवमध्ये ३४ अर्ज दाखल झाले आहेत. या आधी ११५० नोंदणीकृत सावकारांनी त्यांच्या सावकारीचे नवीनीकरण केले आहे. सावकारीची वाढती संख्या पाहता या सावकारीचा विळखा किती घट्ट होतोय, याकडे सरकार लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारसमोर मोठे आव्हान
शेतक-यांना या काळात वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देणे,बेकायदेशीर सावकारीला आळा घालणे, कर्ज वसुलीच्या तक्रारींवर कारवाई करणे सरकार समोरची प्रमुख आव्हाने आहेत. दुष्काळात अडकलेल्या शेतक-यांच्या समोरच्या या समस्या सोडवण्यासाठी सरकार नेमके काय पाऊल उचलणार, हे पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
आता कठोर पावले उचलावी लागणार
दुष्काळात हातचे पीक गेल्याने शेतक-याला खर्च भागवण्यासाठी सावकाराकडे जावे लागते. मराठवाड्यात कर्जाच्या ओझ्याखाली येऊन शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू नये, यासाठी सरकारने कठोरात कठोर पावले उचलण्याची गरज आहे. आगामी काळात सरकार काय भूमिका घेते, यावर सावकारीचे भवितव्य अवलंबून आहे.
















