मुंबई : प्रतिनिधी
पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलेले असताना सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून हिंदी शक्तीबरोबरच शक्तिपीठ महामार्ग, शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी आणलेले जनसुरक्षा विधेयक आदी विषयांवर सरकारची कोंडी करण्याची मोर्चेबांधणी विरोधकांनी केली आहे. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी चहापानाचे आयोजन केले असून, प्रथेप्रमाणे विरोधक बहिष्कार घालणार अशी शक्यता आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव व राज ठाकरे ५ जुलै रोजी एकत्र येऊन मोर्चा काढणार असून राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षही सहभागी होणार आहेत. यावरून राज्याचे राजकारण तापलेले असताना, सोमवारी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या कमी असली तरी महायुती सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधाकांकडे यावेळी अनेक मुद्दे आहेत. पहिलीपासून हिंदीची सक्ती, शेतक-यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करणे, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने केलेले घुमजाव, अंदाज समितीच्या धुळे दौ-यात सापडलेले कोट्यवधी रुपयांचे घबाड, पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण असे अनेक मुद्दे विरोधकांच्या हातात आहेत. याचे पडसाद या अधिवेशनात उमटू शकतात.
उद्धव-राज मनोमिलनामुळे ठाकरे गटात उत्साह
५ जुलैच्या मोर्चाच्या निमित्ताने तब्बल १९ वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही मोठी घडामोड आहे. यामुळे विधानसभेतील पराभवानंतर खचलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मनोधैर्य वाढले आहे. त्यामुळे अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आधार घेत महायुती सरकारने राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला आहे. याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अनिवार्य हा शब्द वगळून हिंदी ऐच्छिक असेल अशी सारवासारव करण्यात आळ. आता ही केवळ मौखिक भाषा म्हणून शिवली जाणार असे सांगितले जात आहे. पण पहिलीपासून हिंदी नकोच अशी ठाम भूमिका मनसे व उद्धव ठाकरे गटाने घेतली आहे. सरकार मात्र अजूनही त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. यामुळे या विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
शक्तिपीठही गाजणार
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतक-यांचा रोष नको म्हणून वर्ध्यातील पवनार ते सिंधुदुर्गातील पत्रादेवी पर्यंतच्या ८०२ किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र निवडणुकीनंतर सत्तेत येताच या महामार्गाला पुन्हा चालना दिली आहे. शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून नेण्यास या जिल्ह्यातील मंर्त्यांचाच विरोध आहे. तरीही हा विरोध डावलून महामार्गाचे काम रेटण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे अधिवेशनात या महामार्गाच्या उपयुक्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारची कोंडी करू शकतात.
महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. राज्यात एप्रिल- मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान केले. गारपीट आणि अवकाळीने शेती पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी होईल असे सांगून तूर्त कर्जमाफीचा निर्णय घेण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. तरीही विरोधी पक्षाकडून अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला जाऊ शकतो.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अध्यक्ष असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीचा पहिलाच धुळे दौरा वादग्रस्त ठरला. समितीच्या या दौ-यात शासकीय विश्रामगृहावर कोट्यवधी रुपयांची रोकड आढळून आली. या प्रकरणाची पोलिस चौकशी सुरू असली तरी यानिमित्ताने विधिमंडळ समित्यांच्या कामकाजाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. विरोधी पक्ष या प्रकरणावरून सरकारवर तुटून पडण्याच्या तयारीत आहे. यानिमित्ताने विरोधी पक्षाकडून सरकारमधील भ्रष्टाचाराच्या काही प्रकरणांना वाचा फोडली जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेत झालेली आर्थिक उधळपट्टी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना निधी देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या पैशांवर मारलेला डल्ला यावरून विरोधी पक्ष सरकारचे वाभाडे काढण्याची संधी सोडणार नाही. त्यामुळे अधिवेशनात आक्रमक विरोधी पक्षाला तोंड देताना सरकारच्या नाकीनऊ येण्याची शक्यता आहे.
या मुद्यांवर अधिवेशन गाजणार?
– पुण्यातील हुंडाबळी ठरलेली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
– मे, जून महिन्यातील पावसाचा मुंबई, पुण्यातील जनजीवनाला बसलेला फटका
– पुण्यात तळेगाव जवळच्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पर्यटकांचा झालेला मृत्यू
– इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा सुरू असलेला गोंधळ