27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ९ लाखांहून अधिक बालके आजारी

राज्यात ९ लाखांहून अधिक बालके आजारी

  जन्मजात व्यंग, कर्करोग

मुंबई : राज्यात आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ या अभियानाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला नऊ लाख ६४ हजार ३८४ बालके आजारी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात जवळपास सात लाख बालकांना बाल्य आजार झाल्याची नोंद करण्यात आली असून, १३ हजार ९०५ बालकांमध्ये जन्मजात व्यंग असल्याचे आढळून आले आहे. या एकूण आजारी बालकांपैकी ९ लाख ६ हजार ८६३ बालकांवर उपचार या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारतर्फे यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ या अभियानाची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून करण्यात आली होती. या अभियानाअंतर्गत राज्यातील शून्य ते १८ वर्षांपर्यंतच्या सुमारे २.६२ कोटी बालकांची आरोग्य चाचणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचे आरोग्य विभागाने निश्चित केले होते. दरम्यान, या अभियानाअंतर्गत आतापर्यंत ९५ टक्के म्हणजेच दोन कोटी ४९ लाख ५४ हजार २५७ बालकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी नऊ लाख ६४ हजार ३८४ बालके आजारी असल्याचे आढळून आले आहे.

३७२ बालकांना कर्करोग
या अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत जवळपास ३७३ बालकांना कर्करोगाचे निदान झाले आहे. तर ४३१ बालकांना बालपणातील टीबीचे निदान झाले असल्याचे आढळून आले आहे. तर बालपणातील कुष्ठरोग आढळून आलेल्या बालकांची संख्या ३०४ इतकी असून ६२ हजार ९२४ जणांना त्वचारोग आढळून आला आहे.

सर्वाधिक बालकांमध्ये दातांच्या समस्या
राज्यातील जवळपास १ लाख ४० हजार १०४ बालकांमध्ये दातांचे विकार आढळून आले आहेत. तर स्वमग्नता आढळून आलेल्या बालकांची संख्या ही १ हजार ११७ इतकी आहे. तर जवळपास २१ हजार ६२५ बालकांमध्ये इतर विकासात्मक विलंबाचे आजार आढळून आले आहेत.

११ हजार बालकांवर शस्त्रक्रिया
आरोग्य विभागाची या अभियानासाठी एकूण ४३ हजार ७७ शिबिरे घेण्यात आली. त्यात एकूण १३ हजार ७१ बालकांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यापैकी ११ हजार ४१२ बालकांवर या अभियाना अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

९६ हजार शाळांमध्ये तपासणी
या अभियानासाठी १२ हजारपेक्षा अधिक पथके कार्यरत होती. त्यानुसार राज्यातील एकूण ९६ हजार ७३७ शाळांमध्ये, तर १ लाख १० हजार ४७३ अंगणवाड्यांमध्ये ही तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR