24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

देशात दर तासाला १९ आत्महत्या

 

मुंबई : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. महाराष्ट्रातच एका वर्षात २२,७४६ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये १९,८३४ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अहवालातून ही धक्कादायक आणि लाजिरवाणी आकडेवारी उघड झाली आहे.

राज्यात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे १९४१ आत्महत्या झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर कर्नाटकात १३३५ आणि आंध्र प्रदेशात ८१५ जणांनी दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. राज्यात बेरोजगारीमुळे ६४२, गरिबीमुळे ४०२ आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे ६४० नागरिकांनी आपले आयुष्य संपवले आहे.

राज्यात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणा-यांची संख्या सर्वाधिक असल्याची बाबही निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षभरात कौटुंबिक कारणांमुळे जवळपास ६९६१आत्महत्या झाल्याचे अहवाल सांगतो. महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मिळून देशातील एकूण आत्महत्यांपैकी ४९.३ टक्के आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.

देशात दर तासाला १९ आत्महत्या
२०२१ मध्ये १,६४,०३३ आत्महत्या झाल्या होत्या तर, २०२२ मध्ये १,७०,९२४ आत्महत्या झाल्या. यापैकी सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात १३.३ टक्के, तामिळनाडूमध्ये ११.६ टक्के, मध्य प्रदेश नऊ, कर्नाटक आठ आणि पश्चिम बंगालमध्ये ७.४ टक्के नोंदल्या गेल्या आहेत. आकडेवारीच्या दृष्टिकोनातून गणना केली तर २०२२ मध्ये देशात दर तासाला १९ लोक आत्महत्या करतील. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात.

गंभीर आजारही आत्महत्येचे कारण
देशभरातील १८.४ टक्के आत्महत्यांमागे गंभीर आजार हे कारण होते. १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोगामुळे होणा-या आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, पंजाब, तामिळनाडू, सिक्कीम आणि गोवा या राज्यांमध्ये रोगामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR