मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावले आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हाधिका-यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ हाच या बैठकीचा विषय असून १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे.
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती व २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या (महानगरपालिका वगळून) पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा मा. राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. या बैठकीमध्ये खालील विषयांचा आढावा घेण्यात येईल असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सोबतच्या परिपत्रामध्ये माहिती तयार करून ती आयोगास पीडीपी फॉरमेटमध्ये ई-मेलद्वारे ९ जुलै २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी सादर करण्यात यावी. तसेच उक्त नमूद सर्व मुद्यांसंदर्भातील माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणा-या बैठकीस आपण व्यक्तिश: उपस्थित राहावे, ही विनंती. सदर व्हीडीओ कॉन्फरन्सची लिंक यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना लिहिले आहे. तसेच, उपरोक्त व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे होणा-या बैठकीस आपण उपस्थित राहावे असेही सांगण्यात आले आहे.
१. निवडणुका घेण्यात येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था
२. मतदार संख्या
३. मतदान केंद्र
४. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (एश्ट)
५. आवश्यक मनुष्यबळ
६. वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे