25 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रएमपीएससीच्या निकालास विलंब, परीक्षार्थी अस्वस्थ

एमपीएससीच्या निकालास विलंब, परीक्षार्थी अस्वस्थ

नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने अन्न सुरक्षा अधिकारीपदासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. मात्र, दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. आयोगाकडून सातत्याने परीक्षा, निकालात होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी-२०२३ रोजी अन्न व औषध प्रशासन सेवेतील अन्न सुरक्षा अधिकारी (गट ब) पदाबाबत जाहिरात काढली. जाहिरातीनंतर ‘अन्न सुरक्षा अधिकारी’ पदाबाबत शैक्षणिक अर्हतेचा गोंधळ निर्माण झाला होता. हे प्रकरण प्रशासकीय न्याय प्राधिकरणाकडे (मॅट) गेले होते. त्यानंतर ५ जून २०२३ मध्ये उमेदवारांची पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १५ सप्टेंबर २०२३ ला जाहीर झाला.

त्यानंतर पात्र उमेदवारांकडून मुख्य परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पार पडली असून १० फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेला होऊन १० महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, असे असतानाही अद्याप परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली असून लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

आर्थिक आणि मानसिक त्रासाला जबाबदार कोण?
परीक्षार्थींनी आयोगाकडे संबधित परीक्षेच्या निकालाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नसल्याचा आरोप आहे. यामुळे परीक्षार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR