मुंबई : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणा-या मुंबई इंडियन्सचा सलग तिस-या पराभव झाला. राजस्थान रॉयल्सने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दणदणीत विजयाची नोंद करताना गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. १० संघांमध्ये अजूनही मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे की ज्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही.
क्वेना क्वेना मफाकाने पहिल्या षटकात यशस्वी जैस्वाल(१०) बाद केले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन व जॉस बटलर यांनी चांगले फटके मारले. आकाश मढवालच्या चेंडूवर संजू ( १२) दुर्दैवीरित्या बाद झाला. बॅटची किनार घेत चेंडू यष्टींवर आदळला आणि राजस्थानला ४२ धावांवर दुसरा धक्का बसला. मढवालने टक ला आणखी एक यश मिळवून देताना बटलरला ( १३) बाद केले. आर अश्विन व रियान पराग यांनी राजस्थानचा डाव सावरला. अश्विन १६ धावांवर माघारी परतल्यानंतरही परागने फटके बाजी सुरू ठेवली. रियानने ३८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५४ धावा केल्या. शुबम दुबेने नाबाद ८ धावा केल्या आणि राजस्थानने १५.३ षटकांत ४ बाद १२७ धावा करून विजय मिळवला.
तत्पूर्वी, राजस्थानने मुंबईला २० षटकांत १२५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. ट्रेंट बोल्टने त्याच्या पहिल्या दोन षटकांत रोहित शर्मा, नमन धीर व इम्पॅक्ट खेळाडू डेवॉल्ड ब्रेव्हिस यांना गोल्डन डकवर माघारी पाठवले. कर्णधार हार्दिक पांड्या(३४) व तिलक वर्मा ( ३२) यांनी ५६ धावांची भागीदारी करून डाव सावरला. युझवेंद्र चहलने फिरकीची जादू दाखवली. बोल्टने ४-०-२२-३ अशी आणि चहलनेही ४-०-११-३ असी उल्लेखनीय स्पेल टाकली. इशान किशन ( १६) व टीम डेव्हिड(१७) फार काही करू शकले नाही. मुंबई इंडियन्सला ९ बाद १२५ धावा करता आल्या.