31.8 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रफडणविसांच्या भेटीनंतर ‘भावना’ बदलल्या

फडणविसांच्या भेटीनंतर ‘भावना’ बदलल्या

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या जागावाटपात अद्याप उमेदवारी जाहीर न झालेले शिंदे गटातील नेते अस्वस्थ झाले आहेत. या अस्वस्थ नेत्यांपैकी एक असणा-या खासदार भावना गवळी यांच्याबाबत सोमवारी नागपूरमध्ये घडलेला प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भावना गवळी या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. त्या सलग पाचवेळा या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. मात्र, अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे भावना गवळी यांची धाकधूक सध्या वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी सोमवारी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील आपल्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भावना गवळी या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घरी गेल्या होत्या. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्यामुळे त्यांच्यासारख्या कलंकित नेत्याला उमेदवारी द्यायची की नाही, याबाबत अद्याप महायुतीकडून निर्णय झालेला नाही. भावना गवळी यांच्याऐवजी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून शिंदे गटाच्या संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भावना गवळी या आपल्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेल्या होत्या. देवेंद्र फडणवीसांच्या घरात जाण्यापूर्वी भावना गवळी यांची गाडी बाहेर थांबली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. तेव्हा भावना गवळी यांनी मी बाहेर आल्यानंतर बोलते, असे सगळ्यांना सांगितले. त्यानंतर भावना गवळी जवळपास २५ मिनिटे देवेंद्र फडणवीस यांच्या घरात होत्या. तिथून बाहेर पडल्यानंतर भावना गवळी या सांगितल्याप्रमाणे मीडियासमोर आल्या नाहीत. त्यांनी फडणवीसांच्या घराच्या अंगणात आपली गाडी बोलावून घेतली व भावना गवळी तिथूनच गाडीत बसून निघून गेल्या. त्यामुळे फडणवीसांच्या घरातील २५ मिनिटांच्या भेटीत नेमके काय घडले, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR