22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeधाराशिवकावळेवाडी येथील तरूणाचा खून

कावळेवाडी येथील तरूणाचा खून

धाराशिव : प्रतिनिधी
मोबाईल चोरल्याच्या संशयावरून कावळेवाडी ता. धाराशिव येथील अमर राजेंद्र लोमटे या २७ वर्षीय तरूणाला चार ते सहा ट्रॅक्टर चालकांनी ऊसाने व काठीने मारहाण केली. मारहाणीची ही घटना दि. ७ फेब्रुवारी रोजी ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखाना येथे वाहन तळावर घडली. जखमी अमर लोमटे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोकी पोलिसांनी यापैकी चार आरोपींना मोबाईल लोकेशन घेऊन तात्काळ अटक केली. शनिवारी दि. १० रोजी ढोकी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी सांगितले की, कावळेवाडी येथील अमर लोमटे हा बुधवारी दि. ७ रोजी सायंकाळी तेरणा कारखाना येथील वाहन तळावरून गावाकडे जात होता. दरम्यान, वाहन तळावरील एका ट्रॅक्टर चालकाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. मोबाईल चोरीच्या संशयावरून वाहन तळावरील चार ते सहा ट्रॅक्टर चालकांनी अमर लोमटे याला ऊसाने व काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. कावळेवाडी येथील एका व्यक्तीने जखमी अमर याला पुढील उपचारासाठी धाराशिव येथील रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना अमर लोमटे याचा दि. ८ रोजी रात्री मृत्यू झाला. दरम्यान, अमर लोमटे याला झालेल्या मारहाणीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेला आहे. शुक्रवारी दि. ९ रोजी राजेंद्र लोमटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार ते सहा जणांच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष तिगोटे यांनी दोन पथके रवाना केली. पथकामध्ये पोलीस नाईक शेळके, श्रीमंत क्षीरसागर, लक्ष्मण शिंदे, महेश शिंदे आदींचा समावेश होता. पथकातील पोलीस कर्मचा-यांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन घेऊन अवघ्या चार तासात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्या चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्यामध्ये अक्षय उर्फ बबलू दत्ता इंगळे, संतोष दादाराव वाघमारे, अकबर शेख, शंकर चौधरी यांचा समावेश आहे. अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ढोकी पोलीसांनी आरोपींना शनिवारी दि. १० रोजी धाराशिव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक हसन गोहर, उपविभागीय पोलीस अधिकारी (कळंब) संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष तिगोटे करीत आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR