सोलापूर : धनश्री नागेश जाधव वय 19 रा:- शिरापूर, ता मोहोळ जि सोलापूर हिचा जाळून खून केल्याप्रकरणी सासरा शिवाजी रामचंद्र जाधव वय 57, सासू मालन शिवाजी जाधव वय 50 दोघे रा:- शिरापूर ता मोहोळ जि सोलापूर यांना झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते – ढेरे यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, दि 1/6/2014 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मयत धनश्री ही देवाची पूजा करीत असताना तिचा नवरा नागेश, सासू मालन असे दोघे तेथे आले. नवऱ्याच्या हातात रॉकेलचा डब्बा सासूच्या हातात काडीची पेटी होती. त्यावर तिचा नवरा म्हणाला की, तुला नांदविण्यास तयार नसताना तू नांदण्यास कशाला येते असे म्हणून तिच्या अंगावर रॉकेल ओतले व सासू-मालन हिने काडी पेटवून तिच्या अंगावर टाकली व तेथे उभा असलेला सासरा शिवाजी हा पण तिला विजवू नका, तिला जिवंत ठेवू नका असे म्हणत होता, अशा आशयाची फिर्याद मयत धनश्री हिने उपचार घेत असताना दिली होती. उपचारादरम्यान दि:-14/06/2014 रोजी धनश्री ही मयत झाली.
सदरचा खटला हा जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे चालला, त्यावर न्यायाधीशांनी खुनाच्या आरोपाखाली आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यावर आरोपींनी सदर शिक्षेविरुद्ध ऍड रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.अपिलामध्ये जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍड रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात, मयताने दिलेल्या दोन्ही मृत्यूपूर्व जबाबांमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आणून दिले तसेच साक्षीदारांच्या जबाबातीत अनेक त्रुटी न्यायालयास दाखविले, त्यावर न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींना 20000 रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.यात आरोपीतर्फे ऍड.रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ऍड जे पी याग्निक यांनी काम पाहिले.