अयोध्या : भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून दर्शनासाठी आतापर्यंत लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी दररोज देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येत पोहोचत आहेत. केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातून देखील भाविक अयोध्येत येत आहेत. मुस्लीम समाजातील २५० रामभक्तांनीही ही अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले आणि जय श्री रामचा नारा दिला.
मुस्लीम भाविकांची गर्दी
२५ जानेवारी २०२४ रोजी, शेकडो मुस्लीम राम भक्तांचा एक गट लखनौ येथून अयोध्येला रवाना झाला. ३० जानेवारीला सुमारे २५० लोक राम मंदिरात पोहोचले. दर्शनासाठी आलेले हे मुस्लिम समाजातील लोक भगवान श्रीरामांना आपला पूर्वज मानतात. लखनौपासून अयोध्येपर्यंत हे मुस्लीम रामभक्त सुमारे १३५ किलोमीटर पायी चालत आले. अयोध्येला पोहोचण्यासाठी त्यांना पाच दिवस लागले.
करोडो रुपयांची देणगी
राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आली होती. त्यानंतर २३ जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. २३ जानेवारी ते २९ जानेवारीपर्यंत सुमारे २० लाख लोकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. भाविकांची गर्दी दररोज वाढतच आहे. त्यामुळे मंदिराने दर्शनाची वेळ एक तासाने वाढवली आहे. इतकंच नाही तर २२ जानेवारी पासून आतापर्यंत ५ कोटी ६० लाखांहून अधिक लोकांनी देणगी दिली आहे.
५०० वर्षाहून अधिक काळानंतर अयोध्येत भव्य राम मंदिरात बनवण्यात आले. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. भगवान श्रीराम हे क्षत्रिय होते. हिंदू आणि मुस्लिमांचे गोत्र एकच आहे. भगवान श्रीराम हे आपले पूर्वज आहेत आणि आपण त्यांचे वंशज आहोत. आमचा धर्म सनातन आहे आणि आम्हाला प्रभू श्री रामाबद्दल खूप प्रेम आहे असे या मुस्लीम लोकांनी म्हटले आहे.