नागपूर : दिवाळीचा सण पुढ्यात असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. पुढे दोन आठवडे ही गर्दी वाढतच जाणार असल्याचे ध्यानात घेऊन रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी स्थानकावर मोठा बंदोबस्त वाढविला आहे.
दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. १७ ऑक्टोबरला वसूबारसपासून दिवाळी पर्व सुरू होत आहे. परिणामी आपापल्या गावी, कुटुंबात जाऊन दिवाळी साजरी करण्याची मनिषा असणारे गावांकडे धाव घेऊ लागले आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुढचे २ आठवडे ही गर्दी सारखी वाढतच जाणार आहे. ते ध्यानात घेऊन आरपीएफ तसेच रेल्वे पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहे.
समाजकंटक तसेच चोर, भामट्यांपासून प्रवाशांच्या चिजवस्तूंना धोका होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकाच्या आतबाहेर बंदोबस्त लावण्यात आला असून गस्तही वाढविण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांच्या हिटलिस्टवर असणा-या सराईत गुन्हेगारांवर नजर रोखण्यात आली असून संशयीत व्यक्तींची लगेच झाडाझडती घेतली जात आहे. फटाके अथवा दुस-या स्फोटक किंवा ज्वलनशिल पदार्थांची रेल्वे गाड्यांमधून ने-आण केली जाऊ नये म्हणून कडक तपासणी केली जात आहे.
बीडीडीएसही सक्रिय
खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्थानक परिसरासत बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (बीडीडीएस) तैनात करण्यात आले आहे. श्वान पथकाकडून स्फोटकांची, अंमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून तपासणी करवून घेतली जात आहे. एकूणच रेल्वे स्थानकावर कडक बंदोबस्त असल्याचे आरपीएफचे आयुक्त आशुतोष पांडे आणि रेल्वेचे पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी सांगितले आहे.