मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित ‘खाशाबा’ या चित्रपटाचा दमदार टीझर अखेर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा भव्य क्रीडापट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओजने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खाशाबा’च्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा टीझर डिजिटल माध्यमांवर आल्याने चाहत्यांमधील उत्सुकता कमालीची वाढली आहे. पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचे भव्य चित्रण, अंगावर काटा आणणारी दमदार दृश्ये, खाशाबांचा संघर्ष आणि चित्रपटाचा थक्क करणारा सिनेमॅटिक आवाका या टीझरमधून प्रभावीपणे अनुभवायला मिळतो.
हा चित्रपट अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी एका ऐतिहासिक पर्वाची नोंद झाली होती.
या भव्य चित्रपटाला दिग्गजांची साथ लाभली असून अजय-अतुल यांचे दमदार संगीत चित्रपटाला लाभले आहे. विशेष म्हणजे खाशाबा यांच्या मुख्य भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली असून, त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. या नवोदित कलाकारासोबतच चित्रपटात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगल्ये, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘खाशाबा’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केली आहे. नागराज मंजुळे यांच्या खास शैलीत साकारलेला हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.
















