26.2 C
Latur
Tuesday, July 29, 2025
Homeराष्ट्रीयऑपरेशनला सिंदूर नाव देणे म्हणजे भावनांशी खेळ

ऑपरेशनला सिंदूर नाव देणे म्हणजे भावनांशी खेळ

खासदार अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवरून आज लोकसभेमध्ये वादळी चर्चा सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेला सुरुवात करत संरक्षण दल आणि सरकारची बाजू मांडल्यानंतर आता विरोधी पक्षांकडून युद्धविरामासह विविध मुद्यांवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अरविंद सावंत यांनीही ऑपरेशन सिंदूरवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

या मोहिमेला सिंदूर असे नाव देणे हा भावनांशी केलेला खेळ आहे अशी टीका सावंत यांनी केली. तसेच हल्ल्यानंतर एकाही देशाने भारताला साथ दिली नाही असा मुद्दा अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. लोकसभेत सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की आम्ही वीर जवानांच्या शौर्याला नमन करतो. पण ऑपरेशन सिंदूरची जेव्हा चर्चा सुरू होते.

तेव्हा या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव का ठेवले असा प्रश्न उपस्थित होतो. पहलगामची दुर्घटना घडली म्हणून या ऑपरेशनला सिंदूर असे नाव दिले गेले. मी काही काळ मंत्री होतो. एका कार्यक्रमानिमित्त काश्मीरमध्ये गेलो होते. तेव्हा पावलापावलावर जवान तैनात केलेले होते. मात्र असे काही झाले की त्या दिवशी पहलगाममध्ये कुणीही सशस्त्र जवान तैनात नव्हता. पर्यटक आले असताना तिथे पोलिसही नव्हते. तिथे जवान तैनात नसतील असे आदेश का दिले गेले होते. इथून तपासाचा सुरुवात झाली पाहिजे.

आम्ही ढोल सैन्याच्या शौर्याचे वाजवू, पंतप्रधानांचे वाजवणार नाही. पंतप्रधानांनी असे काय शौर्य दाखवले. पाकिस्तानने विनवणी केली म्हणून युद्धविराम केला गेला असे आताही सांगितले गेले. मग बिनशर्त युद्धविराम का केला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपण युद्ध थांबले असे रोजच सांगत असतात. जर पाकिस्तान शरण येत होता तर तुम्ही बिनशर्त युद्धविराम का स्वीकारला. पाकिस्तानवर अटी का लादल्या नाहीत. अटी लादायला हव्या होत्या. त्यानंतरही आपल्यावर हल्ले होत राहिले.

यावेळी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना अरविंद सावंत पुढे म्हणाले की, आपल्या शेजारचा एकही देश आपल्यासोबत बोलत नाही. आम्ही विश्वगुरू आहोत. पूर्ण जगभर फिरतो. आमचे पंतप्रधान दोनशे देशांमध्ये गेले. पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत बोलतो. पण या संघर्षावेळी संपूर्ण जगातील एकही देश तुमच्यासोबत उभा राहिला नाही. इस्राइल आपल्यासोबत उभा राहिला आणि आपण आपल्याला तेलाचा पुरवठा करणा-या इराणला दुखावले असा प्रश्न अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

केवळ पहलगामच नाही तर याआधीही आपण कारगिलमध्ये ऑपरेशन विजय राबवले होते. मात्र त्यानंतरही गलवानसारख्या घटना घडल्या, डोकलाम घडले. सीमेवर घुसखोरी सुरू आहे. चीनकडून घुसखोरी होतेय. पाकिस्तानला या युद्धात कुणीकुणी मदत केली. चीन मदत करत होता. तुर्की ड्रोन पुरवत होता, त्यामुळे आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR