मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावर राजकीय चिमटे काढायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पण या प्रकरणात टोला हाणला. राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा राजकीय भूकंप असल्याचा टोला त्यांनी हाणला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला आहे. तर नार्वेकर आजारी आहेत, ही राजकीय भूकंपाची सुरुवात असल्याचा समाचार राऊत यांनी घेतला.
बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार
जानेवारी महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर खासदार राऊत यांनी हा पलटवार केला. राहुल नार्वेकर आजारी पडले, ही राजकीय भूकंपाची सुरुवात असल्याचा टोला त्यांनी हाणला. राहुल नार्वेकर यांच्या आजारपणानिमित्ताने पुन्हा वार-प्रतिवार सुरु झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाने एकमेकांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होणार होती. पण नार्वेकर यांची तब्येत बिघडल्याने सुनावणी रद्द झाली. त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांविरोधात अपात्रता याचिकांवरील कामकाज पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यापूर्वी या याचिकांवर निकाल होणे अपेक्षित आहे.