रायगड : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी शरद पवार यांच्यावर पुन्हा थेट हल्ला चढवत अनेक गौप्यस्फोट केले आणि राष्ट्रवादीच्या विरोधात राष्ट्रवादीच लढण्याचे स्पष्ट संकेत दिले. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड मतदारसंघांत निवडणूक लढवेल, असे जाहीर केले. त्यामुळे चारपैकी तीन लोकसभा मतदारसंघांत अजित पवार गटाची लढत शरद पवार गटाच्या उमेदवाराविरुद्ध होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर रायगडमधील कर्जत येथे पार पडले. आज दुस-या दिवशी शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आम्हाला सातत्याने गाफिल ठेवले गेल्याचे सांगत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. १ मेचा दिवस होता, त्यावेळी मला तुम्ही सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असे सांगितले. २ तारखेला कार्यक्रम होता, कुणाला काही माहिती नव्हते, घरातील ४ जणांना राजीनाम्याबाबत माहिती होती.
१५ जणांची समिती झाली. त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याबद्दल ब-याच जणांना धक्का बसला. परंतु मला माहित होते, म्हणून मी बोललो, असे अजित पवार म्हणाले. एवढेच नव्हे, तर एकीकडे पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि दुसरीकडे युवक आणि महिला आघाडीच्या लोकांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानबाहेर आंदोलन करायला त्यांनीच सांगितले होते, असाही आरोप त्यांनी केला.
या सर्व प्रकारामुळेच एक घाव दोन टुकडे केले, असे सांगताना २ जुलैला आम्ही शपथ घेतल्यानंतर पुन्हा आम्हाला १७ जुलैला वाय. बी. सेंटरवर का बोलावले. काय निर्णय घ्यायचाच नव्हता तर आम्हाला बोलावण्याची गरज काय होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच पुण्यातील उद्योजकाच्या घरी बोलावल्यावरूनही प्रश्न उपस्थित केला.
पवार यांचा राजकीय प्रवास धुळीस मिळवायचा डाव
तुमचे प्लॅनिंग कधीपासून होते, हे स्वत:च्या मनाला विचारा. पाच वर्षापासून शरद पवारांचे डोके कोणी कोणी खाल्ले? हे जरा परमेश्वराला स्मरून महाराष्ट्राला सांगा. कोण कोण माणसे आहेत, जी शरद पवारांना सांगायची की चला भाजपत जाऊयात. अशा परिस्थितीत उद्विग्नावस्थेत आलेला माणूस शेवटी काय करतो, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. २०१४ पर्यंत कोणी बोलले नाही. कारण हे सत्तेत होते. शरद पवारांचा राजकीय प्रवास कायमचा धुळीस मिळवायचा. महाराष्ट्राचा पुरोगामित्वाचा चेहरा कायमचा संपवून टाकायचा आणि आपण सत्तेत राहायचे हे आम्हाला नामंजूर होते. सत्ता महत्त्वाची नाही तर काही विचार, तत्त्वे आहेत. तुम्हाला काय सगळे गेले खड्ड्यात फक्त सत्ता हवीय, अशा शब्दांत आव्हाड यांनी हल्लाबोल केला.