लखनौ : असे नाही झाले पाहिजे की स्वदेशी बद्दल बोलायचे आणि घड्याळ घालायचे विदेशी असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे खासदार रवि किशन यांचे कान टोचले. स्वदेशी वस्तू विक्री प्रदर्शन कार्यक्रमाचे गोरखपूमधील चंपा पार्क मैदानात आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वदेशी वस्तूंबद्दल भाषण देणा-या रवि किशन यांनी योगींनी भरसभेतच सुनावले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले स्वदेशी वस्तू वापरा आणि स्वदेशी वस्तूच खरेदी करा. माझी विनंती आहे की, या दिवाळीला तुम्ही तुमच्या घरांमध्ये शेणापासून बनवलेले दिवेच लावा. कारण प्रत्येक हिंदूच्या घरात गौरी लक्ष्मीची पूजा करताना याचा वापर होतो. असे मानतात की, यात लक्ष्मी असते.
याच वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, कोणतीही भेटवस्तू द्यायची असेल, तर ती स्वदेशी द्या. रवि किशन व्हायला नाही पाहिजे की, स्वदेशीबद्दल बोलायचे आणि घड्याळ विदेशी वापरायचे असे योगी आदित्यनाथ हसत हसत म्हणताच उपस्थितानाही हसू अनावर झाले.
पुढे योगी आदित्यनाथ म्हणाले ही गोष्टी मी त्यांना सांगितली आहे. मी त्यांना म्हणालो की, जे बोलणार आहात, तेच करा आणि जितके करणार असाल, तितकेच बोला. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की, आपण जी काही भेटवस्तू द्याल, ती स्वदेशीच द्या.
२०२४ मध्ये एका जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदार रवि किशन यांनी नाल्यावर घर बांधल्याचा मुद्दा मांडत खडेबोल सुनावले होते. गोरपूरचे रस्ते रुंद झाले आहेत. गोरखपूरमधील नालेही बनले आहेत. इतर शहरांमध्ये खूप कठीण आहे. आपल्याला कुठल्या नाल्याचे काम करायचे असेल, तर त्या नाल्यावर आधीपासूनच लोक राहत असतात. जसे रामगडतालमध्ये रवि किशनने नाल्यावरच घर बांधलेले आहे आणि त्यामुळेच आम्ही योजना बनवली की घर नाल्यावर बनवू नका असे योगी म्हणाले होते.