15.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeराष्ट्रीयएनसीईआरटीने बारावीच्या पुस्तकातून बाबरी मशिदीचे नाव हटवले

एनसीईआरटीने बारावीच्या पुस्तकातून बाबरी मशिदीचे नाव हटवले

नवी दिल्ली : नॅशनल कॉन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) ने इयत्ता बारावीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मोठे बदल केले आहेत. या पुस्तकातून बाबरी मशिदीचे नाव काढून त्या जागी ३ घुमटांची रचना असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे अयोध्या वादाचा अध्यायही छाटण्यात आला असून अनेक माहिती काढून टाकण्यात आली आहे. पूर्वी हा अध्याय ४ पानांचा होता, तो आता २ पानांचा करण्यात आला आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, या पुस्तकात गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या अशी भाजपची रथयात्रा, कारसेवकांची भूमिका, ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेला जातीय हिंसाचार, भाजपशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आणि अयोध्येतील घटनांबाबत भाजपची खंत व्यक्त करण्यासारखे अध्यायही छाटण्यात आले आहेत. याआधी असे वृत्त होते की, पुस्तकातून विध्वंसाचे किमान तीन संदर्भ आणि रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित प्रकरण बदलण्यात आले आहेत.

मिळालेल्या वृत्तानुसार, जुन्या पुस्तकात १६ व्या शतकात मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने बाबरी मशीद बांधल्याचे सांगण्यात आले आहे. आता त्यात बदल करून १५२८ मध्ये श्री राम जन्मस्थानी तीन घुमटांची रचना उभारण्यात आली होती असे लिहिण्यात आले आहे. यासोबतच या संरचनेत बदल करत असताना अनेक हिंदू चिन्हे तशीच राहिली आणि संरचनेच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर शिल्पे होती, असेही नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR