मुंबई : प्रतिनिधी
त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळयात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी जिष्णु देव वर्मा यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा तसेच इतर कुटुंबीय, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गो-हे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, तसेच वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
जिष्णु देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत. १२ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
जिष्णु देव वर्मा यांची जुलै २०२४ मध्ये तेलंगणाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली होती. सन २०१८ ते २०२३ या कालावधीत ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. जिष्णु देव वर्मा यांनी वित्त, ग्राम विकास व ऊर्जा खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. आधुनिक कला, चित्रकला आणि शिल्पकलेची आवड असलेले जिष्णु देव वर्मा हे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज संस्थेच्या त्रिपुरा विभागाचे संयोजक होते आणि संस्थेच्या ईशान्य भारतातील उपक्रमांचे समन्वयक होते. ते उत्तम लेखक व कवी देखील आहेत.

