परभणी : शेतीला पूरक अशा शेळी पालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायातून ग्रामीण स्तरावर स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होऊन विकासाची नवीन द्वारे खुली होऊ शकतील. त्याकरिता पारंपरिक पद्धतीने ग्रामीण स्तरावरील शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायांना तांत्रिक मार्गदर्शनाची जोड देणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे शेळी व कुकुट पालन प्रशिक्षणाची आज गरज आहे असे प्रतिपादन नागपूर येथील माफसूचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांनी केले.
जागतिक बँक अर्थसहाय्यित स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पशु सखींचे पंधरा दिवसीय निवासी प्रशिक्षण पशुवैद्यकीय महाविद्यालयात दि.२३ जानेवारी रोजी सुरू झाले. या निवासी प्रशिक्षणाचे उद्घाटन संचालक विस्तार शिक्षण माफसू नागपूर डॉ. अनिल भिकाने यांनी आॅनलाईन पद्धतीने केले. यावेळी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रकल्प सहसमन्वयक डॉ सुनित वानखेडे यांनी केले.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नेमाडे यांनी या भागामध्ये पशुसंवर्धन विभाग, पशुपालन आणि संवर्धन या बाबतीतले वेगवेगळे प्रकल्प सुरू असून त्याद्वारे ग्रामीण भागातील आर्थिकस्तर उंचवण्याचा प्रयत्न होत आहे अशी माहिती दिली. अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ नरळदकर यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी पशुपालकांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सदैव अग्रेसर असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प डॉ कल्पना करगावकर, तांत्रिक अधिकारी डॉ निलेश खलाटे, विद्यापीठ स्तरावरील या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सारीपुत लांडगे आॅनलाइन पद्धतीने उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ. काकासाहेब खोसे यांनी केले. सदरील निवासी प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता प्रकल्प सहसमन्वयक डॉ. सुनीत वानखेडे, प्रशिक्षण सह समन्वयक डॉ.अनिता चप्पलवार, डॉ. साजिद अली, डॉ. काकासाहेब खोसे परिश्रम घेत आहेत. यावेळी महाविद्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.