15.3 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeराष्ट्रीयविधानसभेतील यशानंतर राष्ट्रवादीची नवी रणनीती

विधानसभेतील यशानंतर राष्ट्रवादीची नवी रणनीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीत दणदणीत कामगिरी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढील रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने फुटीनंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला. आता गतवैभव प्राप्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहे. यंदा दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडेल आणि दिल्ली विधानसभेत पक्षाचा आमदार असेल, असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला.

२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. ४० आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रवादी अजित पवारांचीच असा कौल दिला असला तरी हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. राष्ट्रवादी एकसंध असताना पक्षाला राष्ट्रीय दर्जा होता. निवडणूक आयोगाने तो एप्रिल महिन्यात काढून घेतला. आता तो दर्जा परत मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यासाठीच पक्ष दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात यश मिळवण्याआधी आम्ही नागालँडमध्ये ७ जागा जिंकल्या. तिथे आमचा उपाध्यक्ष आहे. अरुणाचल प्रदेशातही आमचे ३ आमदार आहेत. तीन राज्यांमध्ये आम्हाला यश मिळाले. आम्हाला अजून बरेच काही मिळवायचे आहे. दिल्लीतही आम्हाला निवडणूक लढवायची आहे. येथे खाते उघडून आम्ही लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवू, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय दर्जासाठी अटी, शर्तीची पूर्तता हवी
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पक्षाकडे ३ राज्यांमध्ये लोकसभेच्या २ टक्के जागा असायला हव्यात. म्हणजेच ३ राज्यांत मिळवून लोकसभेत ११ खासदार हवेत. एखाद्या राजकीय पक्षाला ४ राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळतो. प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत किमान ६ टक्के मते किंवा २ जागा निवडून आणणे गरजेचे आहे. ६ टक्क्यांपेक्षा कमी मते असल्यास विधानसभा निवडणुकीत किमान ३ उमेदवार विजयी व्हायला हवेत, अशा अटी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR