चंदीगड : पंजाबमधील कपूरथला येथे निहंग शिखांच्या एका गटाने केलेल्या गोळीबारात एक पोलिसांचा मृत्यू झाला असून तीन पोलिस जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे पोलीस एका प्रकरणात काही निहंग शीखांना अटक करण्यासाठी आले होते. वृत्तसंस्थेशी बोलताना कपूरथलाचे एसपी तेजबीर सिंह हंडाल म्हणाले की, पोलिस कर्मचारी रस्त्यावर उभा होते तेंव्हा त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. कपूरथला जिल्ह्यातील कसबा सुलतानपूर लोधी येथे निहंग शिखांच्या एका ग्रुपने गुरुद्वारा साहिबवर कब्जा केला होता. त्याच्या कब्जा मोडून काढण्यासाठी पोलिस तेथे पोहोचले होते. यादरम्यान निहंग आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. त्यामुळे एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला असून अन्य तीन पोलीस जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुलतानपूर लोधी येथील ऐतिहासिक गुरुद्वारा श्री बेर साहिब समोर असलेल्या निहंगांच्या गुरुद्वारा अकाल बुंगाच्या संचालन आणि ताब्यावरुन निहंग गटातील दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादाने गुरुवारी धोकादायक वळण घेतले आहे. पोलिस आणि नागरी प्रशासन हे विवाद सोडवण्यात अपयशी ठरले.
यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या, त्याचा परिणाम आजूबाजूच्या घरांवरही दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, वादामुळे पोलिस आणि निहंगांमध्ये गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोळीबार सुरू झाला आणि सुमारे अडीच ते तीन तास हा गोळीबार सुरू होता. तेजबीर सिंह हंडाल म्हणाले की, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निहंग शीख मुळात अकाली निहंग म्हणून ओळखले जातात. ते १० वे शीख गुरु गोविंद सिंग यांच्या ‘खालसा पंथ’शी संबंधित आहेत.