28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये

निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे अजित पवारांना सोडून शरद पवार गटाची साथ देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार असा सज्जड दमच अजित पवारांनी दिला. शरद पवारांसोबत जायचं असेल तर लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असेही ते म्हणाले.

लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर याआधीही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. निलेश लंके असं काही करणार नाहीत असं ते म्हणाले होते. त्यानंतर बुधवारी आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार असून त्यांना अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखेंच्या विरोधात उतरवले जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल
आमदार निलेश लंके यांनी चुकीची भूमिका घेऊ नये, आणि घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार असे अजित पवार म्हणाले. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर पक्षांतरबंदी कायद्यान्वये आमदारकी जाते असे अजित पवार म्हणाले.
निलेश लंके यांनी जर शरद पवारांची साथ द्यायचं ठरवलं तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हिप सर्वांना लागू आहे, त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतली तर त्यांची आमदारकी जाणार असा इशाराच अजित पवारांनी दिला. त्यामुळे निलेश लंके आता काय करणार हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR